आतापर्यंत दोन आरोपींची जामीनवर मुक्तता
हिंगोली (ZP firing case) : जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारामध्ये भाजयुमो जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी करण्यात आले होते. त्यातील एका आरोपीची यापूर्वीच जामीनावर मुक्तता झाली असून आता दुसर्या आरोपीचाही जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.
हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयात (ZP firing case) भाजयुमो जिल्हाध्यक्ष पप्पू उर्फ आसराजी चव्हाण हे १ ऑगस्ट २०२३ रोजी काही कामानिमित्त आले होते. कार्यालयातील काम आटोपून वाहनात बसत असताना काही जणांनी अचानक त्यांच्यावर केलेल्या गावठी कट्ट्याच्या गोळीबारात पप्पू चव्हाण जखमी झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आरोपींचा छडा लावला होता. सदर प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात सरकारतर्फे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी वरून अक्षय इंदोरिया, ओम पवार, सत्यम देशमुख, राम काळे, अजिंक्य नाईक, सतिष बाबुलाल कुशवाह यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्र फिरवून गुन्ह्यातील सर्वच्या सर्व आरोपींना अटक केली होती.
दरम्यान, हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. यातील सत्यम नरसिंग देशमुख याचा १५ नोव्हेंबर रोजी न्यायाधिश एस.एस. माने यांनी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सतिष कुशवाह याच्या जामीनसाठी अॅड. अर्पित बगडिया यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अर्ज दाखल केला होता. ज्यामध्ये दोन्ही बाजुच्या विधीज्ञांनी केलेल्या युक्ती वादानंतर न्या.अरूण आर. पेडनेकर यांनी ६ डिसेंबर रोजी आरोपी सतिष कुशवाह याचा जामीन अर्ज काही अटींवर मंजूर केला. (ZP firing case) आरोपी तर्फे छत्रपती संभाजीनगर येथील हिंगोलीचे अॅड.अर्पित कमलकिशोर बगडिया यांनी काम पाहिले.