बुलडाणा (Bail Pola) : पोळा आज; कृषक संस्कृतीतला वृषभराजाचा सण. श्रावण अमावस्येला संधीप्रकाशात ताटात निरांजन ठेवून सर्जा-राजा सारख्या अनेक जोड्यांची पंचारती करुन त्यांना पुरण-पोळीचा नैवेद्य भरविण्याचा दिवस. राब-राब राबणार्या बैलांना एक दिवस आराम देत, त्यांना न्हाऊन-धुवून अन् सजवून-धजून तयार करत सायंप्रहरी त्यांच्या गावातून मिरवणूक काढत अन् वेशीवर बांधलेल्या तोरणाखालून बैल आणला, म्हणजे बळीराजा धन्य झाला.
अशा (Bail Pola) पोळ्याचा उत्सव आला असताना दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सर्वत्र सुरू आहे. यात काही ठिकाणी बैल वाहून जाण्याच्या घटनाही घडत आहे. अशाच घटनेवर प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांनी एक कविता सोशल मीडियावर व्हायरल केली असून, ती तुफान गाजत आहे. ती कविता पुढीलप्रमाणे..
वातावरण चिंब होते रात्रभर,
तेवत होती मनात काळज्यांची वात..
खडकाळ शहरांना कळणार कशी
नदीलगतच्या गावांची उतमात ?
बरसणारा पाऊस हा काहींसाठी,
मौजमस्तीचा भरजरी शेला..
कोसळण्याचं दुःख विचारा त्याला,
ज्याचा लाडका बैल वाहून गेला !