परभणी (Parbhani):- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात (Agricultural University) परभणी शहरातील नागरीकांना फिरण्यासाठी शुल्क आकारुन त्यांना ठराविक मार्ग सोडून इतरत्र फिरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्वच लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व पदाधिकार्यांमधून संताप व्यक्त केला जात असून जन आंदोलन उभारण्याचे बोलले जात आहे.
शेतकर्यांची जमीन कृषी विद्यापीठाला संशोधनासाठी दिली
खानापुर, शेंद्रा, बलसा या गावची व इतर काही शेतकर्यांची जमीन कृषी विद्यापीठाला संशोधनासाठी दिली गेली. आज या विद्यापीठात संशोधनाचे काम कमी व गुत्तेदारीचा काळाधंदा चालू असतो. परभणी शहराला कृषी विद्यापीठा सोडले तर इतर एकही चांगले ठिकाण नाही. सकाळी परभणीकरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी विद्यापीठात नागरीक मोठ्या प्रमाणावर फिरण्यासाठी येतात. मॉर्निंग वॉकसाठी येणार्या नागरीकांना शंभर रुपये शुल्क लावण्याचा व दिलेल्या मार्गावर फिरण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी घेतला. यापूर्वी सकाळी आठ वाजेपर्यंत विद्यापीठात वाहनास बंदी घातलेली आहे. शुल्क व फिरण्याच्या मार्गावर घातलेल्या बंदीच्या विरोधात परभणीकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी हा निर्णय वापस घेण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी विद्यापीठात फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावण्याची घटना घडली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने ओळखपत्र देत शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.या निर्णयानंतर आता लोकप्रतिनिधी, नागरीकांमधून विरोधाचा सुर उमटत आहे.
चुकीचा निर्णय आहे
कृषी विद्यापीठात नागरीकांना फिरायला शुल्क लावणे व बंदी घालणे हा निर्णय चुकीचा आहे. परभणीकरांना सकाळी ऑक्सीजन घेण्यास बंदी घालणे म्हणजे घटनाबाह्य आहे. कुलगुरुंनी इतर चांगल्या कामात लक्ष घातले पाहिजे.
मी बोललो शुल्क लागणार नाही
कुलगुरु डॉ. इंद्र मणि व कुल सचिव संतोष वेणीकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. शुल्क आकारण्यात येणार नाही. व फिरण्यावर बंदी देखील उठविली जाईल. फक्त मुलींच्या निवासस्थानाकडे फिरण्यास बंदी राहिल. परभणीकरांना स्वच्छ ऑक्सीजन घेण्यास कोणी रोखु शकत नाही.
परभणीकरांच्या हक्काचे विद्यापीठ आहे
कृषी विद्यापीठासाठी परिसरातील शेतकर्यांनी छातीवर दगड ठेवून जमिनी दिल्या. जमीन आमची व विद्यापीठ तुमचे कसे होईल. जमिनी लिजवर देवून काम करत आहात? तेंव्हा परभणीकरांना विद्यापीठात फिरण्याला बंदी घालण्याचा निर्णय चुकीचा आहे. परभणीकरांच्या हक्काचे विद्यापीठ असून निर्णय वापस न घेतल्यास आंदोलन करणार. – खा. संजय जाधव.
कुलगुरुंना बोलून मार्ग काढू
कुषी विद्यापीठात परभणीतील जनतेला फिरण्यास बंदी घालणे चुकीचे आहे. काही घटना घडल्यामुळे हा निर्णय घेतला असला तरी कुलगुरुंना बोलून परभणीकरांना फिरण्यासाठी विद्यापीठ मोकळे करु, असे मत आ. राजेश विटेकर यांनी व्यक्त केले.
संरक्षणाच्या दृष्टीने निर्णय घ्यावा
कृषी विद्यापीठात नागरीकांना फिरायला बंदी घालणे चुकीचे आहे. शुल्क फार नसले तरी इतर संरक्षणाच्या दृष्टीकोनातून विद्यापीठ प्रशासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. परभणी शहरातील नागरीकांना विद्यापीठ हे एकमेव मॉर्निंग वॉकसाठी ठिकाण चांगले आहे. तेंव्हा कुलगुरु यांनी हा निर्णय वापस घेतला पाहिजे.
शुल्क रद्द करावे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात नागरीक, खेळाडूंना सकाळी फिरण्यासाठी लावण्यात आलेले शुल्क रद्द करण्याची मागणी प्रतिष्ठीत नागरीकांकडून करण्यात येत आहे.विद्यापीठात मोठया प्रमाणात पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी येत असतात. शुल्क लावल्यामुळे सध्या अश्वमेध मैदान देखील बंद आहे. कुलगुरूंनी प्रोत्साहन देणे अपेक्षीत असतांना अडथळे निर्माण केले जात आहे. तात्काळ शुल्क रद्द न केल्यास त्या विरोधात आंदोलन उभे करण्यात येईल.
प्रवेश शुल्क योग्यच, ओळखपत्र आवश्यकच
कृषी विद्यापीठ हे शेतकरी, विद्यार्थी, संशोधनासाठी कार्य करते. शहरात सुविधा मिळत नाहीत म्हणून आरोग्य राखण्या हेतू नागरीक या परिसरात येतात. या बद्दल आक्षेप नाही. परंतु या विस्तीर्ण परिसरात बाहेरुन येणार्या काही उपद्रवी लोकांमुळे फिरायला येणार्या सामान्य नागरीकांची, इथल्या रहिवाशांची किंवा विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येत आहे. याची जबाबदारी कोण घेणार. – प्रविण देशमुख, सदस्य राज्य कृषी परिषद पुणे.
वाहने आडवा नागरीकांना जावू द्या – रामभाऊ आरगडे
परभणीतील जनतेला फिरायला जाण्यासाठी दुसरे एकही चांगले ठिकाण नाही. मॉर्निंग वॉकला ठराविक ठिकाणी फिरण्यास रोखणे म्हणजे चुकीचा निर्णय आहे. वाहनांना आडवा जावू देवू नका. पण नागरीकांना फिरायला जावू दिले पाहिजे. मोठ्या संख्येने फिरायला येणार्या नागरीकांचे आरोग्य चांगले राहत आहे, असे मत नागरीक रामभाऊ आरगडे यांनी व्यक्त केले.