कारंजा(Washim):- शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कारंजा तालुक्यातील भामदेवी परिसरात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे तेथील निर्माणाधीन बंधारा फुटल्याने तीन शेतकऱ्यांची शेती (Farm)खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले.
भामदेवी येथील तीन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
निर्मानाधिन बंधाऱ्याचे पाणी शेतात घुसल्याने शेताला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर अचानकपणे बरसलेल्या पावसामुळे तेथील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची एकच तारांबळ उडाली. शिवाय जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले होते. अचानक आलेल्या या पावसामुळे ज्या नाल्यावर बंधारा बांधणे सुरू होते, त्या नाल्याला मोठा पूर आला आणि त्यामुळे निर्मानाधीन बंधारा फुटून त्याचे पाणी रमेश चंदनशिव, पवन गुल्हाने व राहुल गुल्हाने या तीन शेतकऱ्याच्या शेतात घुसले. त्यामुळे या शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली. प्रशासनाने खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Compensation) द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.