मानोरा (Washim):- जगभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्हयातील पोहरादेवी येथील ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियम ही वास्तू समाज बांधवासाठी प्रेरणादायी आकर्षण ठरत असल्याने संतनगरीत येणाऱ्या भक्त व पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
७०० कोटी पेक्षा अधिक निधी अथक प्रयत्न करून मंजूर
तिर्थक्षेत्र पोहरागड येथे देवी जगदंबा माता, संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी तसेच उमरीगड येथे संत जेतालाल महाराज, सामकी माता मंदीरावर देवी व संताचा आशीर्वाद घेण्यासाठी देशभरातील लाखो भक्त दरवर्षी रामनवमी यात्रा महोत्सवासाठी येतात. तत्कालीन पालकमंत्री बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी बंजारा काशीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून ७०० कोटी पेक्षा अधिक निधी अथक प्रयत्न करून मंजूर करून आणला. या निधीतून बंजारा विरासत नंगारा भव्य, दिव्य वास्तूचे काम पूर्ण झाले असुन विविध मंदीर, भाविक भक्तांच्या सेवेसाठी भक्त निवास व इतर कामे सुरू आहेत. नंगारा वास्तू सोहळयाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी पार पडला. या कार्यक्रमास राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis), अजित पवार(Ajit Pawar), कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ – वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री, खासदार, आमदार, विविध राज्यातील बंजारा लोकप्रतिनिधी, समाजातील महंत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
२०१८ मध्ये या वास्तुसंग्रहालायाचे भूमिपूजन झाले होते
पोहरादेवी (ता. मानोरा) बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. देशभरातील १० कोटी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी, धर्मगुरू रामरावबापू महाराजांची समाधी आणि आई जगदंबेचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे बंजारा येणाऱ्या प्रत्येकास देशभरातील बंजारा समाजाचे संपूर्ण दर्शन व्हावे, या दृष्टीकोनातून लोकनेते, राज्याचे तत्कालीन मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ – वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नाने पोहरादेवी विकास आराखड्यांतर्गत येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नंगारा वास्तुसंग्रहालय साकारण्यात आले आहे. २०१८ मध्ये या वास्तुसंग्रहालायाचे भूमिपूजन झाले होते. आज जागतिक दर्जाचे असे हे संग्रहालय तयार झाले असुन या वास्तू संग्रहालय पाहण्यासाठी देशभरातील भक्त व पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.