नाशिक (Nashik):- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)परिवार वादावर नेहमी टीका करीत असतात. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने ते इतके हतबल झाले की, त्यांनाच परिवार वादाला सहकार्य करावे लागले. त्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशातील बारामती (Baramati)हा पहिला मतदार संघ आहे की, एकाच कुटुंबातील पाच जणांना खासदार व आमदारकीची पदे प्राप्त करण्यात यश आले.
सुनेत्रा पवार आता दिल्लीच्या(Delhi) संसदीय राजकारणात सक्रिय होतील
शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आता दिल्लीच्या(Delhi) संसदीय राजकारणात सक्रिय होतील. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत अजित पवार (Ajit Pawar) व रोहित पवार कामकाज पाहतील. एकूणच पवार कुटुंबात सध्या तीन खासदार आणि दोन आमदार झाले आहेत. आता राजकीय नेत्यांपेक्षा भाजपच्या अंतर्गत गोटात चर्चा सुरू झाली आहे की, आपण पक्ष फोडले, कुटुंब फोडले पण ते फोडल्याचा तोटा झाला की फायदा? भाजपचे कार्यकर्ते आता डोक्याला हात लावून बसले आहे. कर्नाटक (Karnatak)मधील रेड्डी बंधूंचा प्रवास अशाच पद्धतीचा होता. त्यांच्याच कुटुंबात आमदार, खासदार, महापौर अशी पदे होती. पण तो विक्रम आता पवार कुटुंबीयांच्या नावे जमा झाला. त्याला भारतीय जनता पक्षाने (BJP)हातभार लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर आता असे म्हटले जाते की, कदाचित विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार उभे राहिले व ते विजयी झाले, तर अजितदादांना तातडीने विधान परिषदेवर घेतले जाईल किंवा युगेंद्र पवारांचा पराभव झाला तर त्यांना देखील विधान परिषदेत घेतले जाईल.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायचे काय?
मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायचे काय? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. मुळातच महाराष्ट्रातील राजकारण इतके गढूळ झाले आहे की, पक्ष फुटणे, पक्ष बदलणे, घराणेशाही यावर सर्वसामान्य जनता चर्चा देखील करायला तयार नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर देखील व्हायला लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे अलीकडचे राजकारण त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उदासीन करणारे ठरू पाहत आहे. अलीकडच्या राजकारणात ज्यांच्यावर जोरदार टीका केली जाते, तो सत्तेत जाऊन बसतो. विशेष म्हणजे निवडणुकीच्या (Elections)राजकारणात जनतेने त्यांना नाकारले, तरी त्यांना मागच्या दरवाजाने का होईना सत्तेच्या प्रवाहात घेतले जाते. हा सर्वसामान्य मतदारांचा अपमान नाही का? यावर देखील आता चर्चा सुरू झाली आहे.
अजितदादांवर ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप
दस्तूरखुद्द देशाच्या पंतप्रधानांनी ज्या अजितदादांवर ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता, त्यांना आरोप केल्यानंतर तीनच दिवसात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) केले. तर त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांना देशाच्या राजकारणात बरोबर घेऊन राज्यसभेत पाठवून खासदार करून टाकले. परिवार वादावर टीका करणारे पक्ष बोलतात एक व करतात एक याबाबत लोकांमध्ये एक वेगळाच संदेश जाऊन पोहोचला आहे. एकाच कुटुंबात एकाचवेळी इतकी पदे असण्याचा हा विक्रमच असेल का? यावर देशभर चर्चा सुरू झाली आहे.