परभणी/जिंतूर (Parbhani) :- पोलीस ठाण्यात तक्रारदारा समोर पोलीस कोठडीत असताना विनाकारण चापट मारण्यात आली. सदर प्रकार चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी जिंतूर पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी करत बदली केली. सदर प्रकरणात सपोनि. मुक्तार जाफर सय्यद यांना वार्षिक वेतनवाढ स्थगितीची शिक्षा देण्यात आली आहे. या बाबत नुकतेच आदेश काढण्यात आले आहेत. सामान्य नागरीकाला मारहाण (beating) करणे पोलीस अधिकार्याला चांगलेच महागात पडले आहे.
सपोनि. मुक्तार जाफर सय्यद यांना वार्षिक वेतनवाढ स्थगितीची शिक्षा
या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अविनाश ग्याळ यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली होती. वरिष्ठांकडेही तक्रार सादर केली होती. जुलै २०२३ मध्ये शहरातील सोने – चांदीच्या व्यापार्यासोबत संगणमत करत सपोनि. मुक्तार जाफर सय्यद यांनी त्यांच्यावर विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान अटक करण्यात आली. फिर्यादी व त्यांचा मुलगा यांना सोबत घेऊन पोलीस कोठडीचे दार उघडत चापटाने मारहाण करण्यात आली. या बाबत व्हिडिओ फुटेज आहेत, अशी तक्रार केली होती. यावरुन अप्पर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करत सपोनि. सय्यद दोषी असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर सय्यद यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. आता पोलीस अधीक्षकांनी आदेश काढत सपोनि. सय्यद यांना वार्षिक वेतनवाढ स्थगितीची शिक्षा दिली आहे.