बीड (Beed):- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. ते सध्या त्यांच्या बीड जिल्यातील माजलगाव विधानसभा मतदार संघाचा (Assembly constituencies)दौरा करीत आहेत. या दरम्यान त्यांनी त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल त्याचे नाव जाहीर केले आहे.
पुतण्याला बनवले उत्तराधिकारी
सध्या उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ जन सन्मान यात्रा काढली आहे. त्यातच प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. प्रकाश सोळंके यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी लगेचच त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल, याचीही लगोलग घोषणा करून टाकली आहे. प्रकाश सोळंके यांनी त्यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघातून जयसिंह सोळंके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार हे आता स्पष्ट झाले आहे. जयसिंह सोळंके हे प्रकाश सोळंके यांचे धाकटे बंधू धैर्यशील सोळंके यांचे सुपुत्र आहेत. धारूर पंचायत समितीचे उपसभापती व बीड जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. काका प्रकाश सोळंके यांच्यासारखे ते राजकारणात सक्रीय आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत धैर्यशील सोळंके यांनी त्याचा फायदा होऊ शकतो.