हिंगोली (Hingoli):- शहरातील १७ प्रभागामधील कचरा उचलणे व त्याच्या वाहतुकीचे कंत्राट अमरावती (Amravati) येथील बेरोजगार क्षितीज नागरीक सेवा सहकारी संस्थेला दिले असून त्यावर जवळपास १५० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. मागील १५ महिन्यापासून संस्थेचे जवळपास ५ कोटी रूपये देयके थकल्याने १ सप्टेंबर पासून कामबंद ठेवण्यात येणार असून या संदर्भात नगर पालिकेला कंत्राटदाराने लेखी पत्रही दिले आहे.
कचरा उचलणे व त्याच्या वाहतुकीचे कंत्राट अमरावती येथील बेरोजगार क्षितिज नागरीक सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले
हिंगोली शहरामध्ये १७ प्रभाग असून या प्रभागातील कचरा उचलणे व त्याच्या वाहतुकीचे कंत्राट अमरावती येथील बेरोजगार क्षितिज नागरीक सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले आहे. सन २०२२ पासून या संस्थेतर्फे स्वच्छतेची कामे करून डपींग ग्राऊंडवर हा कचरा नेवून टाकला जातो. या स्वच्छतेच्या कामाकरीता शहरात २२ घंटागाड्या असून त्यावर ४४ कंत्राटी कामगार व ५ ट्रॅक्टर २५ कर्मचारी तसेच ६० स्वच्छता कर्मचारी व इतर पर्यवेक्षक असे जवळपास १५० कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना संस्थेकडून वेतन दिले जाते. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून(State Govt)घनकचरा व्यवस्थापनाचा निधी मिळणे आवश्यक आहे. मागील १५ महिन्यापासून केंद्र व राज्य शासनाकडून निधी देण्यात आला नाही. त्यामुळे संस्थेचे जवळपास ५ कोटी रूपये देयके थकले आहेत.
वेळोवेळी तगादा लावला जात असल्याने संस्थेने त्यांच्या जवळील निधीतून कामगारांचे वेतन अदा
या संदर्भात कंत्राटदाराने अनेक वेळा नगर पालिकेकडे पत्र देऊनही देयके उपलब्ध होत नाहीत; परंतु कामावर असलेल्या कर्मचार्यांकडून कंत्राटदाराकडे (contractor) वेळोवेळी तगादा लावला जात असल्याने संस्थेने त्यांच्या जवळील निधीतून कामगारांचे वेतन अदा केले; परंतु आता संस्थेकडेही कामगारांच्या वेतनासाठी पैसे उपलब्ध नाही. परिणामी काही कामगारांनी काम सोडल्यामुळे त्याचा परिणाम दैनंदिन कामावर जाणवत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव संस्थेने २७ ऑगस्टला हिंगोली नगर परिषद मुख्याधिकार्यांना पत्र दिले आहे. मंजुराचे वेतन करण्यासाठी व वाहनातील डिझेल पुरवठा करण्याकरीता संस्थेकडे पैसे नाहीत. परिणामी कर्मचार्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी देयके अदा न झाल्यास स्वच्छतेच्या कामावरील कामगार काम बंद ठेवतील त्यामुळे नाईलाजास्तव १ सप्टेंबर पासून कामबंद ठेवण्या संदर्भात नगरपालिकेला कंत्राटदाराने लेखी पत्र दिले आहे . या संदर्भात नगर पालिका प्रशासनाकडे संपर्क साधला असता घनकचरा व्यवस्थापनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येक ५० टक्के निधी दिला जातो; परंतु तो निधी मिळाला नसल्याने वेतन थकले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छतेमुळेच सलग चार वर्षापासून पारितोषिक
हिंगोली शहर स्वच्छतेध्यमध्ये मागील चार वर्षापासून देशभरात अव्वल ठरत आहे. त्यामुळेच आतापर्यंत ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या व ब दर्जा नगर पालिकेमध्ये स्वच्छतेत सातत्य कायम टिकून आहे. त्यामुळेच हिंगोली नगर पालिकेचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन केंद्रीय नगर विकास मंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. हिंगोली नगर पालिकेला स्वच्छतेत आतापर्यंत १५ कोटी रूपयाचे पारितोषिक मिळालेले आहे.