परभणी(Parbhani) :- शहरातील डॉ.लाईन बसस्थानक (Bus stand)रोड परिसरात असलेल्या श्री साई मेडिकलचे शटर वाकवून मेडिकल मधून सुट्टे पैसे व नोटा मिळून ४० ते ४५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी शहरातील डॉ.लाईन बसस्थानक रोड परिसरातील घटना
डॉ.साईनाथ रेवणवार यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीच्या परिवाराच्या नावे श्री साई मेडिकल नावाचे औषधी दुकान आहे. नेहमीप्रमाणे १२ फेब्रुवारीच्या रात्री कर्मचार्यांनी मेडिकल बंद केले. १३ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास फिर्यादीच्या काकांनी त्यांना फोनवर मेडिकलचे शटर उघडे दिसत आहे असे सांगितले. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. मेडिकलमध्ये जावून पाहणी केल्यावर त्यांना रोख रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोह. उगले करत आहेत.