शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी एकावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!
परभणी (Worker certificate) : सेलू येथे खोटे बांधकाम कामगार प्रमाणपत्र सादर करत शासनाकडून लाभ मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी एकावर ९ जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकाने निरीक्षक श्रेणी १ विवेक पाटील यांनी फिर्याद दिली आहे. कामगार उपायुक्त यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बोगस कागदपत्र यांच्या विरुध्द दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहिम राबविण्यासाठी पथक गठीत केले आहे. या पथकाने ९ जुलै रोजी सरकारी कामगार अधिकारी परभणी या कार्यालयात प्रत्यक्ष जावून चौकशी केली. सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड यांनी त्यांच्या कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारी तपासणीसाठी सुपूर्द केल्या. या तक्रारीचे अवलोकन केल्यावर सेलू तालुक्यातील वालूर येथील अन्वर खान दिलावर खान पठाण याने बनवेगिरी केल्याचे समोर आले. सदर व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र दाखल करत नोंदणी केल्याचे निदर्शनास आले.
ग्रामपंचायत कार्यालय कन्हेरवाडी ता. सेलू तसेच संबंधित ग्रामसेवक यांनी दक्षता पथकासमोर हजर राहुन जबाब दिला. ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयाने निर्गमित केलेले नसून ग्रामसेवकाचे शिक्के व सह्या बोगस असून त्याचा गैरवापर केला आहे, असे कळविले. अन्वर खान दिलावर खान पठाण याने २४ नोव्हेंबर २०२० ते ९ जुलै २०२५ या कालावधीतपरभणीतील ग्रामपंचायत कार्यालय कन्हेरवाडी ता. सेलू येथून या नावाचे ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे ग्रामसेवकाचे बनावट कागदपत्र (Worker certificate) तयार करुन ते खरे असल्याचे भासवत शासनाकडून विविध योजनेतून ३५ हजार रुपये मंजूर करुन घेत लाभ मिळविला. शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी संबंधितावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. गणेश पवार करत आहेत.




