शहरातील लाला लजपतराय वार्डातील प्रकार
भंडारा (Bhandara Heavy rain) : स्मार्ट सिटी बनण्याचे स्वप्न पाहणार्या भंडार्यातील लाला लजपतराय वार्डात अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलेला आहे. मुस्लिम कब्रस्तानाच्या भिंतीला लागून असलेल्या घरातून पावसाच्या धारा निघत आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या घराला धोका निर्माण झाला असून तेथील नागरिकांना जीव धोक्यात घालून जीवन व्यतीत करावे लागत आहे. दरवर्षी उद्भवणार्या परिस्थितीकडे नगरपालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने तीव्र संताप व्यक्त करुन तेथील नागरिकांना घरकुलाचा लाभ देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
भंडारा शहर कुठल्या ना कुठल्या समस्यांबाबत नेहमीच प्रकाश झोतात राहिलेला आहे. स्मार्ट सिटी बनण्याचे स्वप्न असलेल्या शहरात समस्यांचा अंबार असल्याचे दिसून येते. जलजीवन योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची प्रचंड दुरावस्थाा होऊन शहरवासियांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे भंडारा शहरातील लाला लजपतराय वार्डात मुस्लिम कब्रस्तानाच्या भिंतीला लागून असेल्या घरांमधून पावसाळ्यात पाण्याच्या धारा निघत आहेत. मुस्लिम कब्रस्तान हा उंचावर असल्याने कब्रस्तानातील पाणी लाला लजपतराय वार्डातून निघत असल्याने ही परिस्थिती नेहमीच उद्भवत आहे.
मुस्लिम कब्रस्तनाच्या भिंतीला लागून असलेली घरे त्यापेक्षा खाल असल्याने घरातून पाण्याचे लोट निघत आहेत. पावसाळ्यात तेथील नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. तर किटकांची तसेच सरपडणार्या प्राण्यांचा धोका निर्माण होऊन घरांना ओलावा आलेला आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवत असल्याने तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर बाब नगरपालिकेच्या लक्षात आणून देखील नगरपालिका प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिका प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेऊन तेथील नागरिकांना आवास योजनेतून घरकूल देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.