बैल पोळ्याच्या हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रातदिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रातदिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
भंडारा (Bhandara Pola) : बळीराजाला समृध्द करणार्या आणि सदैव साथ निभावणार्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच ‘बैल पोळा’. शेतकर्यांचा कष्टाचा सोबती बैल. शेतकरी व बैलांच्या जिव्हाळ्याचा नात्याचा प्रतिक म्हणजे (Bhandara Pola) ‘पोळा’. शेतकर्यांचे आराध्य दैवत असलेल्या सर्जा राजाचा उत्सव संपूर्ण जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी झडत्यांनी पोळ्याचे मैदान गाजले होते.
कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. शेतकर्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख-दु:खात सहभागी असणार्या व शेतकर्यांसाठी वर्षभर राबणार्या शेतकर्यांच्या खांद्याला खांदा लाऊन काबाडकष्ट करुन काळ्या मातीतून सोनं पिकवणार्या सर्जा राजा जोडीप्रती सद्भावना व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण अमावस्येला पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मराठी संस्कृतीमधील शेतकरी राजाच्या व महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा अतिशय महत्वाचा सण असून या सणाला अनन्य साधारण महत्व आहे.
कृषिप्रधान संस्कृतीमधील महत्वाचा सण म्हणून पोळा (Bhandara Pola) ओळखला जातो. श्रावण अमावस्येला पोळा सण साजरा करण्याची पध्दत आहे. ज्या शेतकर्यांकडे बैल नाही, अशा शेतकर्यांनी मातीच्या बैलाची पूजा केली जाते. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन देण्यात आले. त्यांची आंघोळ घालून त्यांच्या खांद्याला हळद व तूपाने शेकण्यात आले. बैल पोळ्याच्या दिवशी त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, अंगावर गेरु व रंगाचे ठिपके, शिंगाना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात घुंगराच्या माळा, नवी वेसन, नवीन कासरा, असा साज शृंगार करुन बैल जोड्या सजवून पारंपारिक वाद्यांच्या गजरात ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन गावातून मिरवणूक काढून पोळ्याच्या मैदानात नेण्यात आले. आंब्याच्या पानाच्या तोरणाखाली बैल जोड्या उभ्या करण्यात आल्या. सर्व शेतकर्यांनी एकमेकांच्या (Bhandara Pola) बैल जोड्यांची मनोभावे पूजा-अर्चा करुन आपल्या राब-राब राबणार्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शेतकरी राजाने पोळ्याचे गीत व झडत्यांनी पोळ्याचे मैदान गाजविले.
शिंगे घासली, बाशिंगे तावली,
मांडुळी बांधली, म्होरकी आवरली,
तोडे चढविले, कासरा ओढला,
घुंगरमाळा वाजे खळाखळा,
आज सण आहे पोळा
गावातील पोलीस पाटील किंवा प्रतिष्ठित व्यक्तींकडून सर्जा राजाची पूजा करुन आंब्याचे तोरण तोडताच पोळा फूटला. पोळा फुटल्यानंतर बैलांची मनोभावे पूजा करुन घरी बनविलेले गोड पदार्थ बैलांना खाऊ घालण्यात आले.
आज ‘तान्हा पोळा’ व ‘घेऊन जागे मारबत…!’
बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी चिमुकल्या बालकांचा उत्साहाचा सण म्हणजे (Bhandara Pola) तान्हा पोळा. हा सण गावागावात, शहरीभागात, वार्डा-वार्डात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तान्हा पोळ्याच्या दिवशी बच्चेकंपनी आपले लाकडी नंदी बैलांना सजवून गावातील सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन तान्हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त लहान बालकांचा उत्साह त्यांची लगबग, वाखाण्याजोगी असते. शेवटी मुलांना खाऊ देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला जातो. नंदी बैलाची सजावट केलेल्या बालकांना प्रोत्साहनपर बक्षिस सुध्दा दिले जातात. या सोबतच पहाटेपासून घेऊन जागे मारबतचा सूर सुध्दा निंनादत असतो. सकाळच्या प्रहारी गावातून मारबतीची मिरवणूक काढून गावाच्या वेशीवर नेऊन दहण करण्याची प्रथा आजही कायम आहे.
सर्जा राजाची संख्या रोडावली
बैलांच्या खुराने शेती केली की घरात खोर्याने समृद्धी येते, असं मानणारा शेतकरी बांधव आणि सगळ्यांनी साथ सोडली तरी वाळलेला कडबा गोड मानुन मालकाच्या सोबत स्वतःही शेतात राबणारे बैल यांच्यातील नात्याला खरंच तोड नाही. कष्टाशिवाय मातीला आणि (Bhandara Pola) बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही, अस असलं तरी आज बैलाच्या दावणी सोडा खुंटे सुध्दा नामशेष होत आहेत. छोट्या ट्रॅक्टरमुळे सर्जा राजा बाजारात हरवले आहे. अन् बैला ऐवजी ट्रॅक्टरचे पण पोळा साजरा होत आहे. त्यातही शेती हाच धर्म मानुन घरासमोर बैल ठेवत आहेत. हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणार्या बैलाचा व शेतकर्याचा आज आवडता सण म्हणजे ‘बैलपोळा’. वर्षभर खांद्याला खांदा लावुन आपल्या मालकासोबत शेतीत घामाच्या धारा वाहुन सोनं पिकवणार्या सर्जा राजाच्या गौरवाचा उत्सव आहे. मात्र दिवसेंदिवस सर्जा राजाची संख्या रोडावत असल्याने शेतकर्यात चिंता व्यक्त केली जात आहे.




