ओडीसा येथून नाशिक येथे पोहोचविला जात होता गांजा
भंडारा (Bhandara police) : ओडीसा राज्यातून महाराष्ट्रातील नाशिक येथे चारचाकी वाहनातून सात प्लास्टिक बोरीमध्ये १६७.१०० कि. ग्रॅ. गांजा तस्करी करीत असतांना भंडारा येथील बीटीबी मार्वेâटमध्ये पार्किंग केलेल्या कारची पाहणी केली असता सदर प्रकार उघडकीस आला. सदर कारवाई भंडारा पोलीसांनी दि. ६ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री दरम्यान केली आहे. भंडारा पोलीसांची ही मोठी कारवाई असून केलेल्या कारवाईत ४५ लाखांचा मुद्देमालासह दोन गांजा तस्करांना अटक केली आहे. सुमित सुभाष धोरवे (३३) रा. आळंदीदेवाची ता. खेड जि. पुणे व रविंद्र कृष्णा शिंदे (३६) रा.नाशिक, असे अटक केलेल्या गांजा तस्करांचे नाव आहे.
दोन गांजा तस्करांसह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीसांना एक ग्रे रंगाची कार क्र.एमएच १५ ईपी ४३७२ या चारचाकी वाहनातून दोन व्यक्ती हे भंडारा मार्गे नागपूर महामार्गाने गांजाची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती भंडारा पोलीसांना मिळाली. भंडारा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी यांनी सदर कारवाई करीता पथक नेमून वाहनाचा नागपूर महामार्गावर शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भंडारा येथील बीटीबी मार्वेâट परिसरातील यार्डमध्ये एक कार पार्किंग केलेली दिसून आली. कारमध्ये दोन व्यक्ती आढळून आले. दोघांचीही विचारपूस केली असता त्यांनी सुमित सुभाष धोरवे व रविंद्र कृष्णा शिंदे, असे नाव सांगितले.
दोघांवरही पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांनी कारची तपासणी केली असता वाहनाच्या मागील भागात सात प्लास्टिक बोरी दिसून आल्या. याची माहिती तत्काळ जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. वाहनातील प्लास्टिक बोरीची पाहणी केली असता त्यात उग्रवास येणारा ओलसर गांजा आढळून आला. दोन्ही गांजा तस्करांनी गांजा हा तुषार भोसले रा. आडगाव शिवार नाशिक व सूरज रा. नाशिक यांच्या सांगण्यावरुन ओरिसा राज्यातून आणला असून नाशिक येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. गांजाचे वजन केले असता १६७.१०० कि. ग्रॅ. किंमत २५ लाख ६ हजार ५०० रुपये असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे.
पोलीसांनी दोघांही गांजा तस्करांना अटक करुन गांजासह २० लाख रुपये किंमतीची कार, असा जवळपास ४५ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे कलम ८ (सी), २० (पी) (२), २९ एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अशोक बागुल करीत आहेत. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अशोक बागुल, यांचे मार्गदर्शनात पोनि गोकुल सुर्यवंशी, पोउपनि दिपक चालुरकर, हनुमंत परताडे, पोहवा क्रिष्णा बोरकर, बालाराम वरथळे, विजय डोयले, पोना अजय कुकडे, सुनिल राठोड, पोशि नरेंद्र झलके, कोमल ईश्वरकर, पोहवा राजेश पांडे, महेश सुर्यवंशी, आिंदनी केली आहे.