लाखनी (भंडारा) :- सध्या विदर्भात उष्णतेचा कहर सुरू असून, मे महिन्यामध्ये तापमानाने (temperature) उच्चांक गाठलेला आहे. अती तीव्र उष्ण लहरींमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. अशातच मुक्या प्राण्यांच्या जीवाचे काय हाल होत असतील याची कल्पनाही करू शकत नाही. अशातच भर उन्हाळ्यात उष्माघाताने पोल्ट्री फार्मवरील(Poultry farm) तब्बल १५३१ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याची घटना लाखनी तालुक्यातील ग्राम केसलवाडा/वाघ येथे घडली आहे.
विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे व तीव्र तापमानामुळे त्याचे अतोनात नुकसान
केसलवाडा/वाघ येथील शेतकरी सतीश वाघाये यांनी गत पाच वर्षांपासून जीवनाचे गाडे चालविण्यासाठी स्वतःचा पोल्ट्रीफार्म उघडून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली. परंतु विज वितरण कंपनीच्या(Electricity Distribution Company) हलगर्जीपणामुळे व तीव्र तापमानामुळे त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. तब्बल ४ तास विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे या शेतकर्याच्या जवळपास १५३१ बायलर कोंबड्या मृत पावल्या आहेत. त्यामुळे ४ लाख रूपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराला विज वितरण कंपनीच कारणीभूत असल्याचे पोल्ट्री फार्म मालकाचा आरोप आहे. विद्युत विभागाने पोल्ट्रीफार्म मालकाला कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा बंद केला होता. हा सगळा प्रकार महावितरण विभागाने (Department of Mahadistribution) हेतुपुरस्पर केला आहे, असा आरोप पीडीत पोल्ट्रीफार्म मालकाने केला आहे. याची सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा तसेच नुकसान भरपाईची रक्कम विज वितरण कंपनीने द्यावी अशी मागणी पिडीत पोल्ट्रीफार्म व्यवसायीकाने केली आहे.