आरोग्य विभागाला रिक्त पदांचे ग्रहण!
भंडारा (Bhandara) : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णालयांमध्ये पुरेसे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या असायला हवीत. मात्र, प्रत्यक्षात असे दिसत नाहीत. भंडारा जिल्ह्याच्या आरोग्य विभागालाही डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य विभागात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची एकूण 1 हजार 54 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 598 पदे भरलेली असून, 456 पदे रिक्त आहेत. परिणामी, रुग्णसेवेवर विपरीत परिणाम जाणवत आहे. शासन व प्रशासनाने तातडीने दखल घेत पदभरती करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेंतर्गत (District Council) येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या माध्यमातून गावस्तरावर ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना आरोग्यसेवा (Healthcare) पुरविली जाते.
आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित बीसीजी, गोवर, हिपॅटायटिस बी, पोलिओ, डांग्या खोकला, घटसर्प, जीवनसत्त्व (अ), जंतनाशक मोहीम, राष्ट्रीय कार्यक्रम, कुटुंब कल्याण, शालेय आरोग्य तपासणी, अंगणवाडी, गर्भवती माता क्षयरोग, कुष्ठरोगींची नियमित तपासणी, असंसर्ग आजारांच्या तपासण्या, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आदी कामांचे नियोजन नियमित असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.
दरम्यान, भंडारा (Bhandara) जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (Health Officer), प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रथम श्रेणी आदींसह अनेक अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यांसह एकूण 456 पदे रिक्त आहेत. काही महिन्यांपूर्वी अनेक जण निवृत्त झाल्यानेही रिक्त पदांचा (Vacancy) बॅकलॉग वाढणार आहे.
हेल्थ वर्कर, परिचारिकांची 247 पदे रिक्त!
आरोग्य विभागात (Health Department) मल्टिपर्पज हेल्थ वर्करची 85, साहाय्यक परिचारिकेची 162, अशी तब्बल 247 पदे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्याऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर लसीकरण, शासनाच्या (Government) विविध योजनांचा प्रचार-प्रसार, तपासणी, लसीकरणात मोलाची भूमिका असते. मात्र, रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा गडगडली आहे. शहरातील महागड्या उपचारांचा भुर्दड सहन होणारा नसल्याने नागरिकांना नाइलाजाने शासकीय रुग्णालयांचा (Government Hospital) आधार घ्यावा लागत आहे.