रक्षित मेश्राम यांची मागणी…
बारव्हा (Bhandara) : शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या (District Marketing Federation) अंतर्गत शासकीय धान खरेदी केली जाते. सन 2024-25 या खरीप हंगामात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली, मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनही अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांना पैश्याअभावी विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पैसे केव्हा जमा होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तरी शासन प्रशासन यांनी याकडे लक्ष देऊन आधारभूत धान खरेदी केंद्राअंतर्गत खरेदी करण्यात आलेले धानाचे चुकारे त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank Account) अदा करावे, अशी मागणी रक्षित मेश्राम यांनी केली आहे.
बहुतांश शेतकरी हे धान उत्पादक…
खरीप हंगाम 2024-25 या हंगामात 2300 रुपये या सर्वसाधारण दराने शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. लाखांदूर तालुक्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने येथील बहुतांश शेतकरी हे धान उत्पादक आहेत. खरीप हंगामानंतर शेतकरी रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात करतात. त्यासाठी त्याला पैशाची गरज असते. परंतु मागील दोन महिन्यापासून धानाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. खरीप हंगामात शेतकरी बँकेतून कर्ज काढून शेती करीत असतो. घरातील इतर कामे सुध्दा शेतकऱ्यांना याच पैशातून करावे लागत असतात. मात्र पैसे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत (Financial Difficulties) सापडला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे…
आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीकरून (Paddy Sales) जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अजूनही धानाचे चुकारे देण्यात आले नाही. आज उद्या धानाचे पैसे बँकेत जमा होणार म्हणून रोजच शेतकरी (Farmer) हे बँकेच्या चकरा मारत आहेत. परंतु शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे जमा न केल्याने कुटुंब चालविणे तसेच इतर देवाण घेवाण करणे कठीण होवून बसले आहे. शासनाने (Government) लवकरात-लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे, अशी मागणी शेतकऱ्यासह रक्षित मेश्राम यांनी केली आहे.