भंडारा (Bhandara):- साकोली तालुक्यातील वडेगाव-खांबा मार्गावरील पुलावरून भजन मंडळींना घेऊन जाणारे पिकअप वाहन नाल्यात कोसळले. त्यात १७ जण किरकोळ जखमी झाले तर दोन निष्पाप चिमुकल्या पुरात वाहून गेल्या. शोध मोहिमेनंतर ३ वर्षीय प्रियांशी मोरेश्वर वाघाडे या चिमुकलीचा मृतदेह (dead body) हाती लागले. मात्र ६ वर्षीय नव्या इंद्रराज वाघाडे या चिमुकलीचा अद्यापही शोध लागला नसून बेपत्ताच (missing) आहे. बचाव पथकाकडून शोध मोहिम सुरू असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत. सदर धक्कादायक व हृदयद्रायक घटना दि.२७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता दरम्यान घडली.
डॉ.रूपेश बडवाईक आपल्या पथकासह घटनास्थळी तळ ठोकून होते
साकोली तालुक्यातील खांबा (जांभळी) येथील भजन मंडळ अर्जुनी/मोर.तालुक्यातील भिवखिडकी येथे दि.२६ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमासाठी पिकअप वाहन क्र.एम एच १२ जेई ७१७३ या वाहनाने गेले होते. कार्यक्रम आटोपून भजन मंडळी स्वगावाकडे परत जात असताना नागझिरा अभयारण्यालगतच्या वडेगाव-खांबा मार्गावर एका पुलावरून भजन मंडळींना घेऊन जाणारे वाहन नाल्यात उलटले. त्यात वाहनातील चालकासह १९ जण नाल्यात कोसळले. आरडाओरड करताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन १७ जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र दोन निष्पाप चिमुकल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. सकाळी बचाव पथकाच्या शोध मोहिमेत ३ वर्षीय प्रियांशी वाघाडे हिचा मृतदेह हाती लागला. तर दुसर्या चिमुकलीचा अद्यापही शोध लागलेला नव्हता. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी अश्विनी मानके, तहसिलदार निलेश कदम, पो.नि.विजय गायकवाड, ता.आरोग्य अधिकारी डॉ.रूपेश बडवाईक आपल्या पथकासह घटनास्थळी तळ ठोकून होते. या घटनेमुळे खांबा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.