Vairagad :- विदर्भात सप्तधामापैकी एक समजल्या जाणार्या भंडारेश्वर देवस्थान मधील कळसावरून गाभार्यात गळती होत असून पुरातत्व विभागाच्या (Department of Archaeology) दुर्लक्षामुळे भंडारेश्वर देवस्थान समितीने कळसावर पालिथीन बांधून पाण्याची गळती थांबवित आहे. केंद्र सरकारच्या (Central Govt)पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देऊन कळसाची डागडुजी करण्याची मागणी भंडारेश्वर देवस्थान समिती कडून होत आहे.
पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष, भंडारेश्वर मंदीरास धोका
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यापासून पूर्वेस ११ किलोमीटर अंतरावर शेकडो वर्षाचा इतिहास लाभलेला विराट नगरी म्हणून संबोधल्या जाणार्या प्रसिद्ध वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर देवस्थान, गोरजाई मंदिर, पाच पांडव देवस्थान, मुस्लिमांचे श्रद्धास्थान इडगाह, बौद्ध विहार तसेच अनेक मंदिरे आणि देवस्थान आहेत. दरवर्षी वैरागड विराट नगरीस हजारोंच्या संख्येत पर्यटक तसेच भाविक भेट देत असतात. राजा बल्लाळशहा यांची भावासून हिराई देवी ह्यांनी आपल्या पतीच्या स्मृती प्रीत्यर्थ वैरगडच्या दक्षिण भागास वैलोचना, खोब्रागडी आणि नाळेवाही या तीन नदीच्या संगमावर एका लहान टेकडीवर भंडारेश्वर देवस्थान बांधले. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने किल्ला आणि भंडारेश्वर देवस्थान आपल्या अधिपत्याखाली घेऊन विकास काम करण्याचे कार्य करीत असते.
ऐतिहासिक वारसा नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असल्याने आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षाने गावातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी ग्रामपंचायाच्या माध्यमातून २५ वर्षापूर्वी श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समितीची स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायत आणि भंडारेश्वर देवस्थान समिती मार्फत महाशिवरात्री व नागपंचमी निमित्त दरवर्षी भव्य यात्रेचे आयोजन केल्या जाते. पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या वास्तुकामध्ये समितीला कोणतेही बांधकाम करू शकत नसल्यामुळे देवस्थान समितीला ऐतिहासिक वारसा जतन करण्यास अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.




