लातूर(Latur):- ज्या विकास कामांबाबत लातूर महापालिका (Latur Municipality) प्रशासनाकडे काहीच माहिती नाही, अशा विकास कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टी लातूरमध्ये करत आहे. विशेष म्हणजे याबाबत संतप्त काँग्रेस(Congress) जणांच्या शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त खानसोळे यांना थेट विचारणा केली असता त्यांनीही याबाबत कानावर हात ठेवले. यामुळे भाजपाच्या ‘फार्स’चाच पर्दाफाश झाला आहे.
जाब विचारताच पालिका उपायुक्तांनी ठेवले कानावर हात!
प्रभाग 14 मधील ज्या विकास योजनेचे भूमिपूजन केले जाणार आहे, त्याची महानगरपालिकेला काही कल्पना आहे का? यासंबंधी शुक्रवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिकेत जाऊन उपायुक्तांकडे विचारणा केली. कोणत्या कामाची भूमिपूजन? कोणी मंजूर केले? कोणत्या योजनेतून काम होत आहे? वर्क ऑर्डर आहे का? यासंबंधी काँग्रेस शिष्टमंडळाने विचारणा केली असता, उपायुक्त खांसुळे यासंबंधी काही उत्तर देऊ शकले नाहीत. महानगरपालिकेला माहिती नसताना असे एखाद्या राजकीय पक्षाला भूमिपूजन करता येते का? याचेही समर्पक उत्तर त्यांना देता आले नाही.
निधी कोण आणला? कोणत्या योजनेतून आणला?
लातूर शहरात, नेमके काय चालू आहे, याचा ताळमेळ प्रशासकीय पातळीवर दिसून येत नाही. निधी कोण आणला? कोणत्या योजनेतून आणला? कोणती एजन्सी काम करणार आहे, याचा कुठलाही ताळमेळ नसताना भारतीय जनता पक्ष भूमिपूजनाचा घाट का घातला जातो आहे, याचे उत्तर महानगरपालिकेत कोणीही देऊ शकलेले नाही, शासन आणि प्रशासन यांच्यात कोणताच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. जर प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत अशा अनधिकृत भूमिपूजन सोहळ्याला पायबंद घातला नाही तर सभापतींकडे तक्रार करण्यात येईल, असे शिष्टमंडळाने महापालिकेला कळवले.