परभणी (Parbhani):- शहरातील पारवा गेट परिसरात गिट्टी मुरुमाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी छोट्या गिट्टी ऐवजी मोठ मोठे दगड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
काम पाहून येथील रहिवाशांना प्रश्न पडला आहे
परभणी शहरातील नवीन नागरी वसाहतीत रस्त्यांसारखी मुलभुत सुविधा (Basic amenities)नाही. नागरीकांना चिखल तुटवत ये – जा करावी लागते. रस्ते (Roads) बनविले तर थातुर मातूर पध्दतीने बनविल्या जात आहेत. पारवा गेट परिसरात नागरी वसाहतीत मागील काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम पाहून येथील रहिवाशांना प्रश्न पडला आहे.
दगडाच्या आकाराची गिट्टी अंथरली
गिट्टी मुरुमाचा रस्ता केला जात आहे. नियमानुसार या ठिकाणी गिट्टी अंथरणे अपेक्षित आहे. मात्र मोठ मोठे दगड टाकलेले दिसत आहेत. या दगडांविषयी संबंधित अभियंत्यांना सुचना दिली असता त्यांनी तात्काळ कंत्राटदाराला फोन करुन दगड फोडण्याविषयी सूचना दिल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजुला कच्च्या नाल्या असल्याने रस्ता खचू नये यासाठी नाल्याच्या बाजुने मोठे दगड लावण्यात आले आहेत. मात्र याच आकाराचे दगड रस्त्यावर देखील अंथरण्यात आल्याचे दिसत आहे. सदर प्रकराकडे महापालिकेने लक्ष द्यावे, रस्त्याचे काम योग्य पध्दतीने करण्याविषयी कंत्राटदारास सुचना द्याव्यात, अशी मागणी परिसरातील रहिवाशांमधून होत आहे.