देगलूर (Nanded):- नांदेड जिल्ह्यातील देगलुर व बिलोली तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या मन्याडनदीच्या दोन्ही बाजूला बिलोली तालुक्यातील गळेगाव व देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेळगाव येथील शेतकऱ्यांच्या शेत जमीनी आहेत. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीतील कामे करण्यासाठी मन्याडनदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
शेतीतील कामे करण्यासाठी नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे
लोहा, कंधार व मुखेड तालुक्यातून वाहत येणारी मन्याडनदी ही बिलोली व देगलूर तालुक्याच्या सीमेवरून वाहत जाऊन पुढे तेलंगणा राज्यास मिळते. बिलोली-देगलूर तालुक्याच्या हद्दीत आल्यानंतर या नदीमुळे देगलूर-बिलोली तालुक्यातील गावांचे शिवार दोन भागात विभागले जातात. बिलोली तालुक्यातील गळेगावच्या अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन ही मन्याडनदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या देगलूर तालुक्यातील वझरगा व तुपशेळगाव शिवारालगत आहे.त्याच प्रमाणे देगलूर तालुक्यातील वझरगा व तुपशेळगाव येथील शेतकऱ्यांची बरीचशी शेतजमीन ही बिलोली तालुक्यातील गळेगाव शिवारात आहे. या तिन्ही गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन नदीपात्राच्या विरुद्ध दिशेला असल्यामुळे त्यांना शेतीची कामे करण्यासाठी वर्षातून अनेक वेळा नदीचे पात्र ओलांडून जावे लागते.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने त्वरित या ठिकाणी मजबूत पुलाची निर्मिती करावी
या नदीच्या (River)पात्रात पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना नदीचे पात्र लोखंडी टोकऱ्यात बसून ओलांडावे लागते. कधी टोकरा नसेल तर विविध साधनांचा वापर करावा लागतो. हा अत्यंत जोखमीचा आणि जीवघेणा प्रवास आहे. त्यामुळे नदीच्या पात्रात पडून कोणत्या शेतकऱ्याचा जीव जाईल याचा नेम नाही. बिलोली-देगलूर तालुक्यातील मन्याड नदीमुळे शिवाराची विभागणी झालेल्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने त्वरित या ठिकाणी मजबूत पुलाची निर्मिती करावी. अशी वझरगा ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.