वर्धा (Sumit Wankhede) : वर्धा जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी आर्वी मतदार संघाची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने अखेर आज जाहीर केली. विद्यमान आमदार दादाराव केचे यांना डावलून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सुमित वानखेडे (Sumit Wankhede) यांचे तिसऱ्या यादीमध्ये नाव जाहीर झाले. आतापर्यंत भाजपाचे 146 उमेदवार जाहीर झाले आहे.
जिल्ह्यातील तीन जागा भाजपाच्या पहिल्या यादीत जाहीर झाल्या होत्या. आर्वी मतदार संघाची उमेदवारी मात्र निश्चित झाली नव्हती. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात याविषयी चर्चा रंगायला लागल्या होत्या. आमदार दादाराव केचे यांनी मुंबई गाठून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक संदेश दिल्यामुळे केचे यांनी 24 नोव्हेंबर रोजी घेतलेला मेळावा स्थगित केला होता. परंतु दुसरी यादी जेव्हा जाहीर झाली त्यात त्याचे नाव नसल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. शिवाय रविवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत माजी खासदार रामदास तडस यांनी भेट घडवून आणली. केचे यांना मात्र यश आले नाही.
2019 च्या निवडणुकीमध्ये सुधीर दिवे यांनी मतदार संघामध्ये भेटीगाठी सुरू ठेवल्या होत्या. अनेक विकास कामे सुद्धा त्यांनी करून आणली. त्यावेळी केचे यांनी मला ही शेवटची संधी द्यावी असे म्हटले होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी दिवे यांची समजूत काढली. केचे यांना 2019 ला पुन्हा उमेदवारी मिळाली. आमदार सुद्धा झाले. तीन वर्षापासून (Sumit Wankhede) सुमित वानखेडे आर्वी मतदार संघात शनिवार रविवारी ठिय्या मांडून बसले. विकासाचे मोठमोठी कामे त्यांनी केली. मतदार संघातील प्रत्येक गावात स्वतःचा समर्थक तयार केला. भाजपाच्या सर्वे मध्ये सुमित वानखेडे (Sumit Wankhede) यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते.
पक्षाने दादाराव केचे बंड करतील हे गृहीत धरून तिसरे यादीपर्यंत हा विषय लांबत ठेवला. तरीसुद्धा केचे यांनी आज उमेदवारीचा अर्ज भरला. एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये सुमित वानखेडे यांच्या उमेदवारीने जल्लोष असला तरी दुसरीकडे केचे यांच्या बंडखोरी मुळे विजयाबाबत संघर्ष करावा लागणार आहे अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली.