अहमदपुरातून मालक, मग उदगिरात कोण.?
उदगीर (BJP Meeting) : गुरूवारी मुंबई येथे भारतीय जनता पक्षाची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात, लातूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला गेला. मात्र, भाजपाच्या नेत्यांनी अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघावर इतर मतदारसंघाच्या तुलनेत गरजेपेक्षा जास्त चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे.
महायुती होणार म्हणाल्यावर, सदरील दोन्ही मतदारसंघ आपोआप राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहेत. तरीही, (BJP Meeting) भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी का म्हणून उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघाला टार्गेट केले असेल.? याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दैनिक ‘देशोन्नती’ला मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक हे यावेळीही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच, महायुतीचे घोडे अहमदपूरसोबत उदगीरवर येवून अडले असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अहमदपुरातून मालक, मग उदगिरात कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निवडणूकपूर्व नको, तर निवडणुकीनंतर महायुती करा..
बैठकीदरम्यान, उदगीर व अहमदपूर मतदारसंघावर जेंव्हा चर्चा येवून थांबली, तेंव्हा सर्वांनी एकमुखाने अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात युती करायची असेल तर, निवडणूकपूर्व युती न करता निवडणूक झाल्यावर करावी, असे मत पक्षश्रेष्ठीसमोर अनेक नेत्यांनी मांडले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, भलत्याच चर्चेला ऊत आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बाजूला सारून, भारतीय जनता पार्टी उदगीर (BJP Legislature) व अहमदपूर मतदारसंघावर दावा ठोकणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
दोन्ही मतदारसंघ भाजपाचे बालेकिल्ले…
उदगीर असो की अहमदपूर मतदारसंघ असो, या दोन्ही ठिकाणी (BJP Legislature) भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. पण, यावेळी मतपत्रिकेवर कमळ चिन्ह दिसणार नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे, आजवर ज्यांनी आपल्या रक्ताचे पाणी भारतीय जनता पार्टी वाढविली त्यांची मेहनत कवडीमोल ठरणार आहे. स्वतःची पार्टी संपविण्याचा नेत्यांचा महायुतीचा नवीन फंडा दोन्ही तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्याला पटला नसल्याचे चित्र असून, त्यांची मागणी मान्य नाही झाल्यास ते वेगळ्या मार्गाचा अवलंब करतील असेही बोलले जात आहे.