चारशे पारचा नारा मतदारांनी नाकारला. भाजपचा रथ २४० वर रोखला. साधा बहुमताचा आकडा गाठता आला नाही. आता बहुमतासाठी उत्तर- दक्षिण बघावे लागते. दक्षिणेतून चंद्राबाबू नायडू आणि बिहारमधून नितीशकुमार यांचा आधार लागेल. अबकी बार मतदारांनी दिली कुबड्यांधारी सरकार, अशी म्हणण्याची वेळ आली.
लोकसभेचे निकाल लागले. डोळ्यात झणझणीत अंजन पडले. बहुतेकांचे डोळे उघडले. मतदारांनी सत्ताधार्यांवर अंकुश लावला. लोकशाहीच्या मर्यादेत वागा. पक्ष फोडाफोडी सोडा. लोकशाहीत मजबूत विरोधी पक्ष हवा. तेव्हाच निकोप, नि:पक्ष लोकशाही यंत्रणा काम करते. विरोधी पक्ष हा लोकशाहीचा महत्त्वाचा अंग तो टिकावा, अधिक बळकट व्हावा हे सर्वांना अपेक्षित आहे. मात्र, सत्तेची हवा डोक्यात घुसते तेव्हा काँग्रेस मुक्त भारताचा नारा लागतो. हे लोकशाही मनाला पटणारे नाही. धर्मवाद की राष्ट्रवाद, अशा भेसूर स्थितीत मतदारांनी शहाणपणा दाखवला. मंदिर नाही, संविधानाच्या बाजूने कौल दिला. ही लोकभावना खरी राष्ट्रभावना आहे, द्वेषाचा नाही, सलोख्याचा संदेश आहे. सत्ताधार्यांना जरा नीट वागा हा धडा दिला. या निकालाने मोदी सरकार नाही एनडीए सरकारच्या बाजूने कौल दिला.
चारशे पारचा नारा मतदारांनी नाकारला. भाजपचा रथ २४० वर रोखला. साधा बहुमताचा आकडा गाठता आला नाही. आता बहुमतासाठी उत्तर- दक्षिण बघावे लागते. दक्षिणेतून चंद्राबाबू नायडू आणि बिहारमधून नितीशकुमार यांचा आधार लागेल. अबकी बार मतदारांनी दिली कुबड्यांधारी सरकार, अशी म्हणण्याची वेळ आली. कोणत्या पक्षाने कोणासोबत बसावे, याचाही एक सूप्त जनाधार असतो. तो पाळला गेला नाही, तर पुढच्या निवडणुकीत अद्दल घडविली जाते हे अनेकदा उघडे झाले. त्याची उदाहरणे मेहबुबा मुफ्ती, शिरोमणी अकाली दल, एआयएडीएमके, आंध्रतील वायएसआर काँग्रेस, ओरिसातील बीजेड़ी आहे. या पक्षांनी भाजपसोबत मैत्री केली. ती त्यांना भोवली. ही चव अगोदर ममता बॅनर्जी यांनीसुद्धा घेतली. त्यानंतर त्या सावध झाल्या. वायएसआर काँग्रेस आणि बीजेडी हे पक्ष भाजपसोबत होते. दोन्ही पक्षांना मोठा फटका बसला. या अगोदर तेलगू देशम पक्ष भाजपसोबत गेला. मागच्या निवडणुकीत लोकांनी त्या पक्षाला जमिनीवर आणले. हा पक्ष पुन्हा भाजपसोबत आला. भाजपचे मंदिर-मस्जीदसारखे मुद्दे न पटणारा एक मोठा वर्ग आहे हा वर्ग लगेच सजग होतो. अन् मग आपल्या पसंतीवर येतो तेव्हा मनासारखे करतो.
महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात संविधान बचाव मुद्दा हिट झाला अन् मंदिर मुद्दा मागे पडला. भाजपने आपली रणनीती राममंदिर मुद्याभोवती आखली. प्रचारातही त्यावर जोर होता. मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोदी फॅक्टरही ओसरला. ‘मोदी है तो मुमकीन है’ हा गैरसमज ठरला. महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशात मोदींच्या सर्वाधिक सभा झाल्या. त्या भागातच भाजपला सर्वाधिक फटका बसला. मोदींच्या महाराष्ट्रात जवळपास १८ सभा झाल्या. त्या ठिकाणी भाजप व मित्रपक्षांचे बहुतेक उमेदवार पराभूत झाले. पहिल्या टप्प्यात विदर्भात निवडणुका झाल्या. त्यासाठी नरेंद्र मोदी यांची रामटेक, नागपूर व भंडारा-गोंदिया या तीन मतदारसंघ मिळून कन्हानमध्ये सभा झाली. त्यापैकी भंडारा, रामटेक दोन्ही जागा भाजपने गमावल्या. नागपुरात नीतीन गडकरी विजयी झाले. हा विजय गडकरी यांच्या विकास कामाचा होय. चंद्रपुरात सभा झाली. तिथे सुधीर मुनगंटीवार पराभूत झाले. वर्धेत सभा झाली. भाजपचे रामदास तडस पराभूत झाले. अमरावतीत सभा झाली. तिथे नवनित राणा हरल्या. सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, नंदूरबार, बीड, मुंबईत सभा झाल्या. तेथे युतीचे उमेदवार पराभूत झाले. केंद्रातील चार आणि राज्यातील एका मंत्र्याला पराभवाचा सामना करावा लागला.
भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघ राज्याच्या शेवटच्या टोकावर आहे. तिथे राकाँचे प्रफुल्ल पटेल व भाजप शक्ती एकत्र आली. त्यावर काँग्रेसने मात केली. २५ वर्षांनंतर पंजा आला. विदर्भ, मराठवाडा, मुंबई, धुळे- नंदुरबार भागात अनुसूचित जाती, जमातींची संख्या मोठी. त्या भागात आघाडीने मुसंडी मारली. जाती, जमातींसाठी राखीव मतदारसंघही काँग्रेस आघाडीने जिंकले. केवळ पालघर हा एकमेव मतदारसंघ भाजपला जिंकता आला. यावरून संविधानाचा मुद्दा किती भारी होता हे लक्षात येते. असेच कमी- अधिक फरकाने चित्र उत्तर प्रदेशात आढळले. काँग्रेसपासून दुरावलेला मतदार या निवडणुकीत परत आला. या मतदारांनी बसपा आणि वंचितला व्होट कटाऊ ठरविले. त्याची मोठी किंमत या दोन्ही पक्षांना मोजावी लागली. स्व:बळाची फाजील ताकद कळली.
चौकशीचा ससेमिरा वाचविण्यासाठी अनेकांनी भाजपला जवळ केले. त्यांनी आपली सरदारकी पणाला लावली होती. ती आता धोक्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकमेव खासदार निवडून आला. खासदार दिला नाही, तर आमदारकी विसरा असा इशारा बारामतीत दिला होता. आता सुनेत्रा पवार हरल्या. शरद पवार गटाने आठ जागा जिंकून असली राष्ट्रवादी पक्ष असल्याचे दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनीही आपली शक्ती दाखविली. एकनाथ शिंदे यांनीही सरदारकी पणाला लावली. आता राज्य गमवावे लागण्याची भीती वाढली. फोडाफोडी, सीबीआय, ईडीचा धाक भाजपला भोवला. पहिल्या नंबरच्या पक्षाला राज्यात दुसर्या क्रमांकावर जावे लागले. हा क्रमांकदेखील वाटून घेण्याची पाळी आली. याच्ो पडसाद विधानसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता वाढली आहे.
भाजपने ज्या राममंदिराचा मुद्दा रेटला, त्या रामनगरी अयोध्येत भाजपचे उमेदवार लल्लूसिंग पराभूत झाले. याच लल्लूसिंगने संविधान बदलण्यास ४०० पारचा नारा दिला होता. मतदारांनी त्यांना घरी बसवले. आजूबाजूच्या मतदारसंघांनाही धक्के बसले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये आणले. त्यामागे नांदेडच्या जागेचे गणित होते. मात्र, मतदारांनी चक्र उलटे फिरविले. काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांना निवडून आणले. अन् एका दगडात भाजपा आणि अशोक चव्हाणांना धडा शिकविला. भाजपमुळे ज्या अनिल देशमुखांना जेलमध्ये जावे लागले, त्या देशमुखांनी वर्धेत शक्ती पणाला लावली. भाजपला धुळ चारली अन् विदर्भात पवार गटाचे खाते उघडले, असे सर्वत्र शेकडो निवडणुकीचे किस्से आहेत.
भूपेंद्र गणवीर
९८३४२४५७६८
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर