उदगीर (Latur) :- भारतीय जनता पार्टी, अजित पवारांच्या (Ajit Pawar)राष्ट्रवादीला अजून किती झोल देणार.? हे त्यांनाच माहीत.! पण, यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. आता, उदगीर विधानसभा मतदारसंघात क्रीडामंत्री(Sports Minister) संजय बनसोडे यांच्या विरोधात, ‘फ्रेंडली फाईट’च्या नावाखाली भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) स्वतंत्र उमेदवार देणार असल्याची बातमी उदगिरात येवून धडकली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उदगीरमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीत झोलझप्पा!
कट्टर राजकीय वैरी असलेले दोन्ही पक्ष, महायुतीत सहभागी झाले खरे.! पण, मनोमिलन व्हायला तयार नाही. ज्यांचा जिथं आमदार त्यांनाच तिथं तिकीट, असे धोरण ठरलेले असतानाही, अचानक ‘फ्रेंडली फाईट’ची आलेली खबर अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. असे घडलेच तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची दिवाळी, आणि घड्याळ ‘भाऊ’च्या आनंदावर विरझन पडणार असल्याचे बोलले जात आहे. बनसोडे यांना अंदाज आला होता. मतदारसंघातील शासकीय कमिटीवर, भाजपाच्या कोणत्याच नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची प्रमुख पदावर निवड केली गेली नाही. किंबहुना, अजूनही भाजपातील प्रमुख नेते सोडता ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांची क्रीडा मंत्र्यांशी नाळ जुळलेली नाही. शिवाय, लोकसभा प्रचारादरम्यान भाजपाच्या बुथप्रमुखांच्या बैठकीत दिलेला गुत्तेदारीचा शब्द फिरविल्याचे चित्रही पाहावयास मिळाले.
भाजपा नेते अजूनही, घोंगडी पांघरूनच..
यावरून, भारतीय जनता पार्टीचा विचार ऐनवेळी बदलणार असल्याचा अंदाज बनसोडे यांना तेंव्हाच आला होता का.? अशी चर्चा आता, उदगीरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मतदारसंघात सर्वात मजबूत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी, निवडणुकीपूर्वीच आपली सर्व शस्त्र खाली ठेवले आहेत की काय.? अशी शंका यावी,असे चित्र निर्माण झाले आहे. भारतीय जनता पार्टी बुडाली तरी चालेल पण, उमेदवार संजय बनसोडे हेच हवेत.! असे वातावरण बनले आहे. प्रदेश पातळीवर उदगीर संदर्भात निर्णय होत असताना, येथील नेत्यांना त्याची कसलीच खबर मिळू नये.! यापेक्षा वाईट अवस्था स्थानिक भाजपाची पुन्हा होणे नाही.! असे बोलले जात आहे.