परभणी/गंगाखेड (Parbhani) :- विधानसभा मतदार संघाचे तीन वेळा अपक्ष आमदार राहिलेल्या सिताराम घनदाट मामा यांनी मंगळवार १७ मार्च रोजी आपल्या असंख्य समर्थकांसह मुंबई येथे भाजपात प्रवेश घेत कमळ हाती घेतल्याने गंगाखेड विधानसभा मतदार संघात भाजपाची ताकद वाढली आहे.
माजी आमदार सिताराम घनदाट मामा यांच्या हाती कमळ
तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येत गंगाखेड विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार तथा सहकार क्षेत्रात आशिया खंडात क्रमांक एकवर असलेल्या अभ्यूदय बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम घनदाट मामा यांनी दोन वर्षापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar) प्रवेश घेत लोकसभा निवडणुकीत तन मन धनाने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांचा प्रचार करत त्यांना विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) महाविकास आघाडीने सोताराम घनदाट मामा यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीत प्रवेश घेऊन विधानसभा निवडणुक लढविली होती.
यात त्यांना अपयश आल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुका विचारात घेऊन माजी आ. सिताराम घनदाट मामा यांनी मंगळवार १७ मार्च रोजी भाजपाच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात माजी मंत्री रविंद्र चव्हाण, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, डॉ. सुभाष कदम, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, सुरेश भुमरे आदींच्या उपस्थितीत सदाशिव आप्पा ढेले, अमित घनदाट, रुद्रवार आदी असंख्य समर्थकांसह भाजपात प्रवेश घेतला आहे. माजी आ. सिताराम घनदाट मामा यांनी कमळ हाती घेतल्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघात भाजपाची प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलल्या जात आहे.