३० लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई
नांदगाव पेठ (Chemical fertilizers) : शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येत असलेल्या रासायनिक खताचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली. ही कारवाई शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील वडगाव माहुरे शेतशिवारात करण्यात आली. आरोपींकडून खतासह ट्रक व अन्य साहित्य असा एकूण ३० लाख ४६ हजार ६०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संजय रमेशचंद्र अग्रवाल (५४) रा. आर्वी, वर्धा, अशोक धनराज रावलानी (५४) रा. कृष्णानगर, अमरावती व ट्रकचालक दिनेशकुमार छबराज यादव (४५) रा. रमबीयाल गंज, उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री वडगाव माहुरे शेतशिवारामध्ये बत्रा यांच्या प्लॉटच्या आवारात काही जण ट्रकमधून खताचे पोते खाली उतरवून ते दुसऱ्या पोत्यात भरत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. त्याआधारे गुन्हे शाखेच्या युनिट एकने तेथे धाड टाकली. त्यावेळी तीन जण तिथे हे ट्रक क्रमांक एमएच २७ बीक्यू ९७८६ च्या बाजूने उभे होते. तर, काही मजूर हे त्या ट्रकमधून भारतीय जन उर्वरक परियोजना भारत युरिया असे लिहिलेले पिवळ्या रंगाचे खताचे पोते उतरवून टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रियल युज ओन्ली असे लिहिलेल्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यात मशिनद्वारे रिसिल करताना दिसून आले.
त्यामुळे त्यांना बिलाबाबत विचारणा करण्यात आली. परंतु, त्यांच्याजवळ कोणतेही बिल आढळूल आले नाही. तीनही आरोपी हे शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाच्या खताचा काळाबाजार करताना आढळून आल्याने याबाबत कृषी विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. गुन्हे शाखेच्या युनिट एक व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकची पाहणी केल्यावर त्यामध्ये खताचे १८९ पोते दिसून आले. तसेच खाली ताडपत्रीवर ४३८ बॅग आढळून आल्या. भारतीय जन उर्वरक परियोजना भारत युरिया असे लिहिले असलेल्या पिवळ्या रंगाच्या पोत्यात युरिया खत आढळले. त्यामुळे तिघांना अटक करून त्यांच्याकडून ट्रक, खताच्या बॅग व अन्य साहित्य असा एकूण ३० लाख ४६ हजार ६०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कृषी अधिकारी प्रवीण विजय खर्चे (४५) यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे व योगेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, फिरोज खान, सतीश देशमुख, अलीमउद्दीन खतीब, नाझीउद्दीन सय्यद, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, अमोल मनोहर यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर, कृषी अधिकारी उद्धव भायेकर यांनी केली.




