पोलिसांच्या हटवादी भूमिकेवर पुरुषोत्तम खेडेकर यांनी घेतला जिल्हा प्रशासनाकडे आक्षेप !
बुलढाणा (Rajmata Jijau) : जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दरवर्षी १२ जानेवारी रोजी तीळ राज्यातूनच नव्हे तर देश विदेशातून लाखो जिजाऊभक्त येत असतात. या भक्तांची वाहने आधी थेट जिजाऊ सृष्टीपर्यंतच्या पार्किंगमध्ये यायची. पण २०२२ पासून कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलीस प्रशासनाने सर्वच बाजूने ४ ते ५ किलोमीटरवर वाहनांची अडवणूक सुरू केल्यामुळे जिजाऊभक्तांची प्रचंड गैरसोय होत आहे.
यावर अनेकदा आक्षेप नोंदवूनही पोलीस प्रशासन या संबंधित काहीही भूमिका घेत नाही, याउलट लॉ अँड ऑर्डर बाऊ केला जातो. मातृतीर्थात येणारे जिजाऊभक्त हे अतिशय शिस्तीने व संयमीपणाने येत असतात, त्यांची नाहक अडवणूक करणे हा पोलिसांचा हटवादीपणा असल्याचा आरोप शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी करून जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात रोष व्यक्त करत या संदर्भात पुढील काळात एक रोड मॅप तयार करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना संबोधन केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, जिजाऊ जन्मोत्सव (Rajmata Jijau) सोहळा जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा व परिसरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. सर्वच माध्यमांनी यास सकारात्मक प्रसिद्धी दिली आहे. याबद्दल सर्वांचेच खूप खूप आभार व कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच अनेकांनी पोलीस यंत्रणेने वाहने सर्वच दिशांनी दूर दूर अडवून ठेवल्याने जिजाऊप्रेमींना झालेल्या त्रासाचा उल्लेख केला आहे. याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.
जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे साजरा होत असलेल्या जिजाऊ जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी दुरदुरुन (Rajmata Jijau) जिजाऊ भक्त येतात. यात तरुण व तरुणीसह वयस्कर ज्येष्ठ महिला पुरुष तसेच लहान लहान लेकरे घेऊन माता भगिनी व कुटुंब येतात. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून २०२२ पासून सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याच्या नावाखाली वाहने सर्वच दिशांनी जिजाऊ सृष्टी पासून ४-५ किमी दूर अंतरावर अडवतात. यात जिजाऊ सृष्टीवरील दुकानदारांच्या गाड्याही अडवल्या जातात. ते ओझे घेऊन जिजाऊ सृष्टी येथे पोचू शकत नाहीत.
परिणामी त्यांना आर्थिक नुकसान व शारिरीक हाल, मानसिक मनस्ताप सहन करावा लागतो. तर अनेक जिजाऊप्रेमी एवढे अंतर चालू शकत नसल्याने नाईलाजाने तसेच परत जातात. बरेचसे जिजाऊप्रेमी लोक (Rajmata Jijau) जिजाऊ सृष्टीवरील पुस्तके व साहित्य खरेदी करण्यासाठीच आलेले असतात. या बाबतीत पोलीस आयजी नाईकनवरे व इन्चार्ज एएसपी महामुनी यांच्या सोबत पूर्णपणे चर्चा झाली होती. एवढेच नाहीतर मराठा सेवा संघाच्या विनंतीवरून मेहकर रोड चौक ते मोती तलाव जालना रोड पार्किंग, टी पॉइंट ते जिजाऊ सृष्टी पार्किंग, जालना रोड ते जिजाऊ सृष्टी सर्वे नंबर ३७,३८ पार्किंग असे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने केलेले आहेत.
२०२२ व २०२३ मध्ये झालेल्या त्रासाबद्दल सविस्तर माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना दिली होती. आ. अमोल मिटकरी यांनी हा प्रश्न विधीमंडळात उपस्थित केला होता. वर्तमानातील जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पोलीस अधिकारी व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी सोबत ३-४ बैठकीत चर्चा करून सुटसुटीतपणा येईल असे सांगितले होते. २०२३ मध्ये स्वतः जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. तरीही त्याचे पालन केले गेले नाही.
या कारणाने मंत्री सुधीर मुनगंटीवार व काही लोकप्रतिनिधी देखील पोहचू शकले नव्हते. तोच प्रकार १२ जानेवारी २०२५ रोजी घडला, त्याचा उल्लेख स्वतः ना. शिवश्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणात केला. कार्यक्रम संपल्यावर आम्ही आयजी. शिवश्री रामनाथ पोकळे व एएसपी महामुनी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. २०२२ पूर्वी आताच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक लोक जमत होते. गाड्या थेट (Rajmata Jijau) जिजाऊ सृष्टी पर्यंत पोचत होत्या,नंतर पार्किंग मध्ये जात. परंतू दुर्दैवाने २०२२ नंतर पोलीस यंत्रणेने लॉ ॲड ऑर्डर नावाखाली त्रास देणे सुरू केले आहे. परिणामी अनेक लोक १२ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे येण्याचे टाळतात. याचा दुष्परिणाम स्थानिक लोकांच्या अर्थ व्यवस्थेवर होत आहे.
मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतलातर लक्षात येईल की, गेल्या ३० अधिक वर्षात (Rajmata Jijau) जिजाऊ जन्मोत्सव अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडतो. पोलीस नावापुरतेच उभे असतात. आमचेच स्वयंसेवक सर्व व्यवस्था पाहतात. परंतू दुर्दैवाने सुमारे ३ ते ४ वर्षांपासून पोलीस यंत्रणा दंगलसदृश वातावरण निर्माण करत असताना दिसतात. आमच्या सहनशीलतेचा बांध फूटू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतू शेवटपर्यंत तसेच राहिल असे नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यापेक्षाही अडचणीच्या ठिकाणी लाखो लोक जमतात . परंतू त्रासदायक ठरत नाही.
या (Rajmata Jijau) पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आमची शासन व स्थानिक जिल्हा प्रशासन यांना विनंती व आवाहन आहे की, कृपया आपण पूर्वीच्या सारखीच केवळ सल्लागाराची भूमिका घ्यावी व अन्य वाहतूक व्यवस्था व पार्किंग व्यवस्था मराठा सेवा संघाच्या भरवशावर सोडावी. पुढील कटू प्रसंग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा, सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नगर परिषद प्रतिनिधी यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात यावी. एक सविस्तर व्यवहारिक ब्लू प्रिंट तयार करून सर्वानुमते त्यावर मे २०२५ दरम्यान शिक्कामोर्तब करावे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असेही आवाहन शेवटी शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी केले आहे.