त्रैमासिक आढावा बैठकीत दिल्या सूचना
हिंगोली (Blood donation camps) : जिल्ह्यात पुरेसा रक्त पुरवठा संकलनासाठी वेळोवेळी रक्तदान शिबिरे घेऊन संकलन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठूळे, डॉ. अभिजीत बांगर, डॉ. फोपसे, कामगार अधिकारी टी. ई. कराड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी, एचआयव्ही /टीबी पर्यवेक्षक रविंद्र घुगे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत (Blood donation camps) रक्तदान शिबिराचे आयोजन करुन पुरेसा रक्तसाठा तयार ठेवावा. यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांनी नियोजन करावे. सर्व गरोदर माताची नियमित एचआयव्ही तपासणी करावी. तसेच संजय गांधी योजना, शिधापत्रिका वितरणाची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. एआरटी सेंटर शिबिराचे आयोजन करुन एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे आयुष्यमान भारत कार्ड काढावेत, अशा सूचनाही श्री. गोयल यांनी यावेळी केल्या.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर केला. हिंगोली जिल्ह्यात सन 2002 पासून आतापर्यंत एकूण 4 हजार 201 सामान्य गटातील रुग्णांची व 279 गरोदर स्त्रियांची नोंद झाली असून एकूण 3 हजार 950 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी झाली आहे. त्यापैकी 1969 रुग्णांना औषधोपचार सुरु आहेत. तसेच सन 2024-25 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर, 2024 या कालावधीत एकूण 22 हजार 215 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 43 एचआयव्ही संसर्गित आढळून आले आहेत. तर 17 हजार 340 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली होती.
त्यापैकी दोन नवीन व पाच यापूर्वीच एचआयव्ही संसर्गित रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. तसेच एचआयव्ही संसर्गित महिलांच्या 7 मुलांचे 18 महिन्यानंतरचे तपासणी अहवाल संसर्गित आढळून आले नाहीत, अशी माहिती दिली. तसेच त्यांनी (Blood donation camps) एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व देहविक्रय करणाऱ्या महिलांना इतर सामाजिक लाभाच्या बाल संगोपन, संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान कार्ड, इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.