कारंजा(Washim) :- कारंजा तालुक्यातील झोडगा येथील अपहृत अल्पवयीन मुलगी घटनेच्या १८ दिवसानंतर १ सप्टेंबर रोजी तांदळी येथे आढळून आली होती. तिची ३ सप्टेंबर रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, यात तिचे शारीरिक शोषण (Physical abuse) झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे संशयीत आरोपीवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
आरोपीस अटक; पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
तालुक्यातील झोडगा येथील १७ वर्ष ९ महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीचे १४ ऑगस्ट रोजी राहत्या घरातून अपहरण (Kidnapping)करण्यात आले होते. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तशी तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान, १ सप्टेंबर रोजी अपहृत अल्पवयीन मुलगी तांदळी येथील शैलेश समाधान गवई (२५) या तिच्या कथित प्रियकराच्या घरी आढळून आली होती. यावेळी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेवून येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हजर केले होते. दोघांचेही बयान नोंदवण्यात आले. पण सुरुवातीला मुलीने वैद्यकीय चाचणीस नकार दिला होता. अखेर ३ सप्टेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या आई – वडिलांसह ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली व १८ दिवसाच्या कालावधीत आरोपीने दोनदा आपले शारीरिक शोषण केल्याचे बयान दिले व स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेतली.
ज्यामध्ये पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी सकारात्मक आली. त्यामुळे पोलिसांनी पीडित मुलीचे बयान व वैद्यकीय अहवालाच्या आधारे मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील आरोपीने जाणीवपूर्वक तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले असा निष्कर्ष नोंदवत आरोपी शैलेश गवई याच्याविरुद्ध कलम ६२(२), आय, ६४(२) (एएम), बीएनएस सहकलम ४,६ पोक्सो या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी व महिला पोलिस उपनिरीक्षक शिल्पा सुरगडे करीत आहेत.