Border Gavaskar Trophy :- भारत (India)आणि ऑस्ट्रेलिया(Australia) यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा दुसरा दिवस शुक्रवारी संपला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४७४ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४६ षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. ऋषभ पंत ६* आणि रवींद्र जडेजा ४* धावा करून क्रीजवर आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 311/6 धावसंख्येसह आपला डाव पुढे केला. स्टीव्ह स्मिथने (१४०) आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३४ वे शतक पूर्ण केले आणि विक्रमांची मालिका रचली. स्मिथने भारताविरुद्ध कारकिर्दीतील 11वे शतक झळकावले. स्मिथ भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज ठरला. पॅट कमिन्स (49) आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही.
रवींद्र जडेजाने(Ravindra Jadeja) त्याला नितीशकुमार रेड्डीकरवी झेलबाद केले. त्यानंतर मिचेल स्टार्क (15) जडेजाच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. नॅथन लियॉन (13) याला बुमराहने एलबीडब्ल्यू आऊट करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला.भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. आकाशदीपने दोन तर वॉशिंग्टन सुंदरने एक गडी बाद केला.
भारताच्या ५ विकेट पडल्या
यानंतर भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) (३) हास्यास्पद फटका खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. पॅट कमिन्सच्या(Pat Cummins) चेंडूवर मिडऑनवर स्कॉट बोलंडने सोपा झेल घेतला. यानंतर यशस्वी जैस्वाल (82) आणि केएल राहुल (24) यांनी संघाची धावसंख्या 50 धावांच्या पुढे नेली. चहापानाच्या वेळेपूर्वी कमिन्सने केएल राहुलला बॉलिंग करून भारताला दुसरा धक्का दिला.
यानंतर यशस्वीला विराट कोहलीची (36) साथ लाभली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 102 धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान जैस्वालने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो दुर्दैवी ठरला आणि 118 चेंडूंत 11 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 82 धावा करून धावबाद झाला. लवकरच स्कॉट बोलँडने कोहली आणि आकाशदीपला बाद करून भारताला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या तीन सामन्यांनंतर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत मेलबर्न (Melbourne)कसोटी जिंकणाऱ्या संघाला मालिकेत आघाडी घ्यायला आवडेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी प्लेइंग इलेव्हन: दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत- यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टॅन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.