Ner Murder case :- तालुक्यातील मोझर येथील खळबळजनक खून प्रकरणाचा निकाल अखेर यवतमाळ न्यायालयाने (Yavatmal Court) दिला असून या प्रकरणातील आरोपी प्रियकर–प्रेयसीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना ३ ऑगस्ट २०२० रोजी घडली होती.
नरेंद्र ढेंगाळेला आयुष्यभराच्या कारावासाची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला
मोझर येथील कमल दगडू चव्हाण याचा रात्री धारदार शस्त्राने (Sharp weapons) गळ्यावर व चेहर्यावर वार करून खून करण्यात आला होता. त्याचा मृतदेह दुसर्या दिवशी सकाळी मोझर येथील स्मशानभूमीत आढळून आला होता. या प्रकरणात मृतकाची आई शोभा दमडू चव्हाण (५०) व तिचा प्रियकर नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे (४५) रा. मोझर यांच्यावर संशयाची सुई फिरली होती. तत्कालीन नेर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर घुगे व प्रशांत मसराम यांच्या तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी मृतक कमलवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून (Murder) केल्याचे आणि मृतदेह (dead body) स्मशानभूमीत फेकल्याचे उघड झाले. सदर प्रकरणाचा निकाल देताना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी आरोपी नरेंद्र ढेंगाळेला आयुष्यभराच्या कारावासाची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला. तर शोभा चव्हाण हिला देखील जन्मठेपेसह १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास तिला सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
या खटल्यात सरकारी पक्षाचे काम सहाय्यक सरकारी वकील अॅड. मंगेश एस. गंगलवार यांनी पाहिले. न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेले ठोस पुरावे ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवले. या निकालामुळे मोझर गावासह संपूर्ण नेर तालुक्यात या खळबळजनक खुनाबाबत न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
