1 गंभीर, 15 जखमी, ब्रम्हपुरी तालुक्यातील सायगाटा मंदिर फाट्या जवळील घटना!
ब्रम्हपुरी (Bramhapuri) : ब्रह्मपुरी-नागभीड मार्गावर सायगाटा मंदिर फाट्या जवळ आज 27 मार्चला दुपारी 2.15 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात (Accident) झाला. नागपूरवरून वडसाकडे जाणाऱ्या श्री ताज कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसने (एमएच 49 एटी 3030) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या हायवा ट्रकला (एमएच 40 सीटी 5690) जोरदार धडक दिली. या अपघातात 15 प्रवासी जखमी (Passenger Injured) झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
नागपूरहून वडसाकडे जाणारी ट्रॅव्हल्स (Travels) भरधाव वेगाने जात असताना एका दुचाकी ओव्हरटेक करून समोरील कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या हायवा ट्रकला धडकली. या भीषण अपघातात 14 प्रवासी किरकोळ जखमी झाले, ज्यामध्ये अजमेर पठाण (22), सुनंदा लोखंडे (29), दीपिका मत्ते (27), चंद्रकला धोटे (70), कमला इंदुरकर (78), पवन कराडे (32), मुस्कान पठाण (25), निशांत मेश्राम (39), कुणाल मडावी (16), सचिन धोटे (32,), गुहू धोंगडे (37), एकनाथ गजभिये (40), छत्रीगसिंग बावणे (45), रोहित नवलाखे (20) तर जितेंद्र गेडाम (26) गंभीर जखमी आहे.
जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यास मदत!
सर्व जखमींना तातडीने ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात (Sub-district Rural Hospital) दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शिपाई राहुल लाखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सेवादलाचे सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर गुड्डेवार यांनी स्वतःच्या वाहनाने जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ब्रह्मपुरी पोलिसांनी (Brahmapuri Police) घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे.




