उदगीर (Latur) :- मतदारसंघातील ८० हजार महिलांच्या खात्यात जवळपास २४ कोटी रक्कम जमा केली, ४० हजार बचत गटांच्या बहिणींना साडी भेट दिली. तरीही, लाडकी बहीण कार्यक्रमाकडे मतदारसंघातील महिलांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या बळावर परभणी, लातूर, नांदेड जिल्ह्यातून बसेसमधून महिलांची गर्दी गोळा करावी लागली. त्यावरून, लाडक्या बहिणीसाठी आपला ‘भाऊ’ ‘द्वाड’च.! असल्याचे बोलले जात आहे.
नांदेड जिल्ह्यातून बसेसमधून महिलांची गर्दी गोळा करावी
मतदारसंघातील शेतकरी (Farmer) मागच्या पाच वर्षाचा हिशोब मागतोय, शेजारच्या सर्व मतदारसंघात तेथील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना भरभरून मदत मिळवून दिली, त्यांना हक्काचा पीकविमा सुद्धा मिळाला, पण उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागले. मदत मिळावी यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कधी आक्रोश मोर्चा तर कधी न्याय मोर्चा काढून रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तरीही, मंत्री महोदयांचे हेलिकॉप्टर (helicopter) जमिनीवर यायला तयार नाही. शेतीवर अवलंबून असलेली आपली कुटुंबपद्धती लाडक्या बहिणीच्या दीड हजारावर जिवंत कशी राहील.? याचे भान आपल्या लोकप्रतिनिधींना असू नये, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही.!
मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून गुलाबी योजनांचा उहापोह
निवडणूक तोंडावर असल्यानेच वेगवेगळे रंगमंच सजू लागले आहेत. चार इमारती बांधल्या, चार रस्ते केले, म्हणजे मतदारसंघाचा सगळा विकास झाला असे म्हणणे कितपत योग्य आहे, याचा विचार व्हायला पाहिजे.! विकास पुरुषाच्या मतदारसंघात आजही रेशन कार्ड काढण्यासाठी ४ हजार, निराधारांच्या पगारीसाठी ६ हजार, विहिरीसाठी २० हजार, घरकुलासाठी १० हजार प्रमाणे पैसे दलालांकडून लुटले जातात, हीच मोठी शोकांतिका आहे. मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून गुलाबी योजनांचा उहापोह केला जात आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली खरी, पण त्याचे मतांमध्ये रुपांतर होणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे, लाडक्या बहिणीसाठी ‘भाऊ’ ‘द्वाड’च..! राहणार असल्याचे बोलले जात आहे.