12 ते 14 मे पर्यंत रंगली प्रबोधनात्मक मैफिल!
नागपूर (Buddha Dhamma Festival) : जगाला शांती, मैत्री तथा बंधुता यांचा संदेश देऊन, विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या 2588 व्या जयंती निमित्य बुटी बोरी येथे भव्य तीन दिवसीय बुद्ध-धम्म महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सिडको मैदानात आयोजित या बुद्ध-धम्म मेळाव्याचे आयोजन बुद्ध जयंती महोत्सव समिती, सातगाव, बुटी बोरी द्वारा करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन दि 12 मे ला सकाळी 8:00 वाजता भदंत महानाम, महास्थवीर यांचे हस्ते करून सर्वजनिक त्रिशरण, पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली. तर सायंकाळी 6:00 वाजता संकल्प बुद्ध विहार, जुनी वसाहत येथून विशाल धम्म रॅली (Huge Dhamma Rally) काढून बुटीबोरी येथील सर्व परिसरातील रॅली सह कार्यक्रम स्थळी पोहचल्या.
बुद्ध जयंती समारोह समितीचा उपक्रम!
त्यानंतर बाबासाहेबांनी बुद्ध धम्मच का दिला या विषयावर धम्माचारी अमृतदीप यांचे व्याख्यान व रात्री 8:00 वाजता जीवनात संघर्ष करणाऱ्या अंध बांधवाचा म्युजिकल ग्रुप ‘स्पर्श दृष्टीदिव्यांगाचा स्वर’ हा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम (Buddha Songs) सादर करण्यात आला. दि 13 मे ला सकाळी 8:30 वाजता भारतीय बौद्ध महासभेचे (Indian Buddhist Mahasabha) कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे (Samata Soldiers’ Corps) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या अध्यक्षतेत तर सत्यशोधक महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी एस नरसिंगे, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक इंजि. पद्माकर गणवीर व भारतीय बौद्ध महासभेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष विलास उंदीरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इतर धर्मातील बांधवाना धम्मदिक्षा दिली. सायंकाळी 7:00 धर्मांतरित बांधवांचा सत्कार व त्यानंतर अशोक जांभुळकर दिगदर्शित अहिंसक अंगुलीमाला हे महानाट्य (Nonviolent Angulimala Mahanatya) दाखविण्यात आले. तर दि 14 मे ला सकाळी 8:00 वाजता सामूहिक त्रिशरण,पंचशील सायंकाळी 7:00 वाजता बुद्ध धम्म व त्याचे भविष्य या विषयावर कोल्हापूर येथून आलेले पाली भाषा व धम्म अभ्यासक अमित मेघावी यांचे व्याख्यान घेण्यात आले.
प्रबोधनात्मक वैचारिक दणदणीत संगीतमय सामना!
त्यानंतर 26 नोव्हेंबर या चित्रपटातील कलाकारांचा, बुटीबोरी येथील निधी इंगोले हिने संगीत क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून सोबतच बुद्ध धम्म मेळाव्याला यशस्वी करण्याकरिता समाजातील ज्या प्रतिष्ठितांनी सहकार्य केले त्यांचा सत्कार घेण्यात आला. तर सायंकाळी 8:00 वाजता महाराष्ट्राचे लाडके गायक उमेश बागडे व भीमाची वाघीण निशा धोंगडे यांच्यात प्रबोधनात्मक वैचारिक दणदणीत संगीतमय सामना ‘आवाज निळ्या क्रांतीचा, जल्लोष भीम बुद्ध गीतांचा ‘ हा बहारदार संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला. या बुद्ध महोत्सवाच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता बुद्ध जयंती समारोह (Buddha Jayanti Celebrations) समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.