चिखली (Buldana):- सोयाबीन –कापसाला भाव नाही, कर्जमाफी पीक विमा, सिंचन अनुदानाचे पैसे मिळाले नाही. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज नाही, महागाई प्रचंड वाढत असून दररोज ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Suicide)होत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या मागण्यांचे रक्ताचे निवेदन पोलीस प्रशसानाने फाडणे म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नाही. या निष्ठूर सरकरारच्या विरोधात बेमुदत अन्नत्याग आंदोलन (Food Abstinence Movement)सावरगाव डुकरे येथे २३ सप्टेंबरपासून आम्ही शेतकऱ्यांनी सुरु केले. आमच्या आंदोलनाला विरोध म्हणून विरोधकांनी सावरगाव डुकरे येथेच आंदोलन सुरु केल्याने गावातील सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन स्थगित केले असून गावा- गावात जावून १ लाख रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार असल्याचे रणशिंग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी फुंकले आहे.
१ लाख रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार
बुधवार २५ सप्टेंबर रोजी माजी मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे(Congress Committee) माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते राहुल भाऊ बोंद्रे व शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सोडण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे बोलत होते. जगाचा पोशिंदा जीवन संपवण्याच्या विंवचनेत असतांना सरकार त्यांच्या मागण्यांवर चर्चा करत नाही. शेतकऱ्यांनाच लुटायचे अन् त्यांना लंगोटी दान करायची असे महायुती सरकारचे धोरण असल्याचेही राहुल बोंद्रे यांनी सांगितले. अन्नत्याग आंदोलन सोपी गोष्ट नाही, शेतकऱ्यांप्रती राहुल बोंद्रे यांच्या मनात आस्था आणि तळमळ असल्यामुळे ते करु शकले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते जेलमध्ये जायला भीत नसल्याचे काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर म्हणाले. राहुल भाऊ बोंद्रे यांच्यासह शैलेश सावजी, सदुनाना ठेंग, अंबादास चिंचोले, शिवराज पाटील, जगन्नाथ पाटील , मनोज लाहूडकर सुधीर पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन माजी मंत्री तथा काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते सोडवण्यात आले.
शेतकरीच आता सरकार बरखास्त करतील : माणिकराव ठाकरे
शेतकऱ्यांच्या मागण्यांना केंद्र व राज्य सरकारकडे किंमत नाही. सरकार शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारत नाही, संवेदानाशून्य सरकराला शेतकरीच बरखास्त करतील, असा हल्लाबोल माजी मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. शेतकऱ्यांच्या रक्तांच्या सह्यांचे निवेदन पोलीस फाडतात याच्या मागे कोण आहे, हे पाहिले पाहिजे, राहुल भाऊ बोंद्रे यांच्यामागे शेतकऱ्यांचा मोठा जनआशिर्वाद आहे. ते सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतात, त्यांची अनेक आंदोलनातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याचेही काँग्रेसनेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
संघर्ष जारी रहेगा : राहुल भाऊ बोंद्रे
शेतकऱ्यांना रक्ताचे निवेदन देण्याची वेळ सरकारने येवू द्यायला नको होती. शेतकऱ्यांच्या रक्ताच्या अपमानाबद्दल विद्यमान आमदारांनी एक शब्दही काढला नाही. पिक विमा, सिंचन अनुदान, कर्जमाफी, हमीभावानुसार माल खरेदी यावर त्यांनी स्वत : आंदोलन करावे, मी शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभागी होईल, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितले. लवकरच एक लाख शेतकऱ्यांच्या रक्ताचे निवेदन राज्यपालांना देणार असून संघर्ष जारी रहेगाचा नाराही त्यांनी दिला.
बँकेचा प्रश्न आमदार ताई विधानसभेत का मांडत नाही : मनोज लाहूडकर
आमदार ताई यांनी शेतकऱ्यांप्रती असणारी तळमळ विधानसभेत मांडावी. चिखली विधानसभा मतदारसंघात जिल्हा केंद्रीय बँकेचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदार ताईंनी पाच वर्षात हा प्रश्न सभागृहात एकदाही का मांडला नाही? असा सवाल उदयनगरचे सरपंच मनोज लाहूडकर यांनी केला. लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्न या आयुधाद्वारे त्या विधिमंडळात आक्रमक का झाल्या नाहीत ? फक्त वैयक्तिक राहुल भाऊ बोंद्रे यांना विरोध म्हणून प्रति अन्नत्याग आंदोलन सावरगाव डुकरे मध्ये करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.