घाटमाथा एकाच दिवशी ५ हायव्होल्टेज सभांनी दणाणला!
बुलढाणा (Buldhana Assembly Election) : चिखली, मेहकर, सिं.राजा व दे.राजा या चार शहरात आज मंगळवार १२ नोव्हेंबर या एकाच दिवशी तब्बल ५ हाय व्होल्टेज सभा झाल्या. त्यातील ३ महायुती तर २ सभा महाविकास आघाडीच्या होत्या. आरोप प्रत्यारोपाच्या या गदारोळात हा दिवस प्रचंड दणाणला तो, घाटावरच्या राजकीय पटलावर! महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. (Buldhana Assembly Election) बुलढाणा जिल्ह्यात ही शिग काठोकाठ भरुन वाहिली ती, मंगळवार १२ नोव्हेंबर या दिवशी. तीन तालुक्यात तब्बल ५ सभा, त्याही दिग्गज नेत्यांच्या.. अन् विशेष म्हणजे सर्वच सभांना हाऊसफुल गर्दी, कहाँ से आते है इतने लोग?
चिखलीत सभा होती ती काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची. तब्बल ४४ वर्षानंतर गांधी घराण्यातील व्यक्ती चिखलीला येत असल्याने व राहुल बोंद्रेंसाठी ही सभा खूपच महत्वाची असल्याने, असेल तेवढा जोर लावून राहुल बोंद्रेंनी राहुल गांधींसाठी गर्दी जमवली होती. सभा जोशात सुरुही झाली. सर्वचजण राहुल गांधी यांची आतुरतेने वाट पाहत होते. अन्य नेत्यांची भाषणे सुरु होती. (Buldhana Assembly Election) सभेचा माहौल हा शिगेला पोहोचत असतांनाच सोशल मिडीया एक्स साईटवर राहुल गांधींची एक व्हिडीओ पोस्ट आली. त्यात नमूद केले होते की- ‘आपण चिखलीला सभेसाठी निघालो होतो. परंतु विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे येऊ शकत नाही.’ या पोस्टनंतर सभास्थळावरील गर्दी पांगते की काय? अशी भिती होती. परंतु झाले उलटेच, विमान बिघडले तरी धुरा पायलटने हाती घेतली. सचिन पायलट यांचे भाषण तुफान गाजले. खा.मुकुल वासनिक त्वेषात बोलले. प्रभारी रमेश चेन्नीथला यांचेही भाषण झाले. पण तत्पुर्वी राहुल बोंद्रेंचे जोशपुर्ण भाषण व गर्दीचा प्रतिसाद बघण्यासारखा होता.
देऊळगावराजा येथे महाविकास आघाडी उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटलांची सभाही दखलपात्र ठरली. जयंत पाटील यांनी केलेली चौफेर टिका सभा गाजवून गेली. या सभेतील डॉ. शिंगणेंची भाषणही लक्षवेधी होते. याच मतदार संघात त्याचवेळी मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी अजीतदादा पवार गटाची सभा सुरु होती. मनोज कायंदे यांच्या प्रचारार्थ अजीतदादा तांत्रिक कारणास्तव येऊ शकले नसलेतरी, ही सभा गाजवली ती.. छगनराव भुजबळ यांनी.
सिंदखेडराजातील या जाहीर सभेतील राकाँ. जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांचे तडाखेबंद भाषण संपुर्ण मतदार संघात बहुचर्चीत ठरले. त्यांनी शिंगणे परिवारालाच टार्गेट केले. या सभेत श्रीमती नंदाताई कायंदे यांचे भावनिक मनोगत स्व.देवानंदभाऊंप्रतीची व्याकुळता दर्शविणारे ठरल्याने या सभेला एक वेगळीच भावनिक किनार लाभली होती.
नंतरच्या दोन सभा मुख्यमंत्र्यांच्या. एक मेहकर व दुसरी देऊळगावराजा येथील. (Buldhana Assembly Election) मेहकर मतदार संघातील लोणारला उध्दव ठाकरे येऊन गेल्याने आता एकनाथ शिंदे येणारच, हे ठरलेलेच होते. शिंदे आले १२ नोव्हेंंबरला दुपारी. त्यांनी उध्दव ठाकरेंनाच टार्गेट करत ना.प्रतापराव जाधव यांच्यासह आ. संजय रायमुलकर यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला. देऊळगावराजात सिं.राजा मतदार संघाचे उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर यांचे प्रचारार्थ झालेली सभाही टोलेजंग होती. या सभेतही शिंदेंच्या रडारवर होते ते ठाकरेच. प्रतिस्पर्धी उमेदवार शिंगणेंनाही त्यांनी फैलावर घेतले.
एकूणच, ५ हायव्होल्टेज जाहीर सभांनी १२ नोव्हेंबरचा मंगळवार चांगलाच धुमधडाक्यात गेला, अन् राजकीय गदारोळात दणाणला तो.. (Buldhana Assembly Election) बुलढाणा जिल्ह्याचा घाटमाथा!