चिखली (Buldhana):- बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शेतकऱ्यांची आर्थिक आश्रयदाती संस्था म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या या बँकेच्या पुनर्जीवनासाठी व थकित कर्जाच्या वसुलीकरिता पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने बँक बचाव कृती समिती स्थापना करण्याची संकल्पना शेतकरी (Farmer)चळवळीत कार्य करणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या विचारातून समोर आली होती. शेतकरी वर्गामध्ये या संकल्पनेला मोठे पाठबळ मिळत आहे.
स्थापनेच्या बैठकीसाठी उपस्थित रहा – संतोष काळे
या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँक बचाव समितीची स्थापना करण्याकरिता दि. २ ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, चिखली तालुका व विधानसभा मतदारसंघातील(Assembly constituencies) शेतकरी, सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व पदाधिकारी तसेच शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या समितीचे निमंत्रक संतोष काळे यांनी केले आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आपल्या घामाचे सिंचन करून काळ्या आईच्या पोटातून मोत्याचे पीक पिकवतो. मात्र, आर्थिक विवंचनेने अद्यापही आपल्या शेतकरी वर्गाची पाठ सोडली नाही हे सुद्धा तेवढेच दाहक वास्तव आहे. आर्थिक अडचणींचा मुकाबला करत नव्या जोमाने पेरणी करणारा व काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कम आर्थिक आधार देण्याची भूमिका बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने मागील अनेक वर्षे चोखपणे निभावली. परंतु, जिल्हा काँग्रेस (Congress)कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी ९९ कोटी ९५ लाख ३३६ रुपये एवढी थकीत कर्जबाकी ठेवल्यामुळे जिल्हा बँक डबघाईला आली. याचा परिणाम म्हणून ग्रामसेवा सहकारी सोसायटी मार्फत होणारे होणारा पीक कर्जाचा पुरवठा बंद पडला असून त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांवर अवलंबून राहावे लागते. या बँकांची कार्यपद्धती पाहता अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहतात तर काहींना ते मिळवण्यासाठी बऱ्याच संघर्ष आणि विलंबाला सामोरे जावे लागते.
“गाव करी ते राव न करी” या म्हणीनुसार कुण्या एकट्या दुकट्याने हे करून भागणार नाही
ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे थकीत असलेले ९९ कोटी पेक्षा जास्त रकमेचे कर्ज वसूल करण्यासाठी शासनाच्या सहकार विभागाकडे व बँक व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागेल. “गाव करी ते राव न करी” या म्हणीनुसार कुण्या एकट्या दुकट्याने हे करून भागणार नाही तर त्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याची जाणीव असल्याने सर्वांनी संघटितपणे लढा उभारण्यासाठी एकत्र यावे लागेल. जिल्हा सहकारी बँकेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘ जिल्हा सहकारी बँक बचाव कृती समिती ‘ स्थापन करण्याची संकल्पना समोर आली आहे. या समितीची स्थापना करण्याच्या हेतूने दि. २ ऑक्टोबर रोजी चिखली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सकाळी ११ वाजता महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी हिताच्या या कार्यात चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सहकारी बँक बचाव कृती समितीचे निमंत्रक संतोष काळे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.