जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना गंभीर निर्देश!
बुलढाणा (Buldhana Zilla Parishad) : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधून शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा हा अतिशय महत्वपूर्ण असून सर्व शाळांमधून त्यासाठीच्या सुरक्षात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश (Buldhana Zilla Parishad) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज शिक्षण यंत्रणेतील सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रस्तुत विषयी असंवेदनशील असणाऱ्या जिल्ह्यातील कोणत्याही शाळा व्यवस्थापनाची गय केल्या जाणार नाही, असा सज्जड इशारा सुध्दा कुलदीप जंगम यांनी दिला आहे.
अलिकडच्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सुमारे २४७० शाळांमधून शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणीसाठी आज शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख इत्यादी पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक (Buldhana Zilla Parishad) जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हे दिशानिर्देश दिले. बैठकीस प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ, योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली ठग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरीष्ठ अधिव्याख्याता डॉ. समाधान डुकरे, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, उमेश जैन, आशिष वाघ व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत पुढे बोलतांना कुलदीप जंगम यांनी सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेचे शासनाने निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णयाकडे लक्ष वेधून शाळानिहाय विद्यार्थी-विद्यार्थिंनींच्या सुरक्षात्मक उपायोजनांचा आपल्या कार्यक्षेत्रात त्वरीत आढावा घेण्याबाबत सूचना दिल्या. (Buldhana Zilla Parishad) तसेच सर्व शाळांमधून सखी सावित्री समिती गठीत करून या समितीच्या माध्यमातून शाळेतील सुरक्षात्मक उपाययोजनांचा नियमित आढावा घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. प्रत्येक शाळेत विद्यार्थी-पालकांसाठी तक्रार पेटी बसविण्यात आलेली आहे किंवा नाही? असल्यास त्याव्दारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कार्यवाही होते किंवा नाही? याबाबत पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी तातडीने आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश सुध्दा दिले आहेत. ज्याशाळांमध्ये तक्रार पेटी निदर्शनास आली नसेल त्यांना तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सुध्दा त्यांनी निर्देशित केले.
शालेय परिसरात कुठल्याही अपप्रवृत्तींना थारा मिळणार नाही व वेळीच वेसण घातल्या जाईल. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा महत्वपूर्ण असल्याने सर्व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधून व शाळा परिसरातील मोक्याच्या ठिकाणी एक महिना कालावधीच्या आत पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली स्थापित करण्याचे निर्देश सुध्दा कुलदिप जंगम यांनी दिले आहेत. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना इजा पोहचवतील अशा कुठल्याही प्रकारच्या अपप्रवृत्ती निदर्शनास आल्यास कठोर पावले उचलण्याबाबत त्यांनी सांगितले. तसेच दिनांक २१ ऑगष्ट रोजीच्या (Buldhana Zilla Parishad) शासननिर्णयाप्रमाणे सुरक्षात्मक उपायोजनांच्या कोटकोर अंमलबजावणी बाबत त्यांनी निर्देशित केले आहे. पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने सर्व शाळांना भेटी देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश सुध्दा त्यांनी दिले आहेत.