चिखली (Buldhana) :- निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा. नागरिकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी विविध स्तरांवर विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात आपल्या ही प्रयत्नांचा खारीचा वाटा असावा ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून, आदर्श विद्यालय चिखलीच्या स्काऊट्स आणि गाईड्स नी, गाईड कॅप्टन सुवर्णा कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनातून दि. २६ ऑक्टोबर रोजी,चिखलीतील संभाजीनगर, कृष्णा नगर, उदासीन महाराज मठ परिसर, चिंच परिसर, बैलजोडी सर्कल, रोकडा हनुमान, बागवान मोहल्ला, माळीपुरा, स्वामी समर्थ मंदिर परिसर, शिवछत्रपती नगर या परिसरातून मतदार जागृती फेरी काढली. ताई, माई, ‘आक्का -मतदान करा पक्का’ आधी मतदान करू, मग बाकी काम करू. अशा घोषणा गाईड्स स्काऊटस यांनी दिल्या.
मतदानाच्या कर्तव्याविषयी जाणिव करून देणारे हस्त फलक गाईड्स आणि स्काऊटस् नी हातात धरले
मतदानाच्या कर्तव्याविषयी जाणिव करून देणारे हस्त फलक गाईड्स आणि स्काऊटस् नी हातात धरले होते. नागरिकांनी संपूर्ण युनिफॉर्म मध्ये असलेल्या गाईड्स आणि स्काऊटसचे जागृती फेरीसाठी कौतुक केले. फेरी माळी पुरा परीसरात पोचल्यावर चिखली चे सन्माननीय तहसीलदार साहेब श्री. संतोषजी काकडे आणि इतरही निवडणूक अधिकारी वर्गाने जागृती फेरीतील गाईड्स आणि स्काऊटसशी तसेच गाईड कॅप्टन सुवर्णा कुळकर्णी यांचेशी संवाद साधला, कौतुक केले. मतदार जागृती फेरी परत शाळेत पोचल्यावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. रामकृष्ण दादा शेटे सचिव श्री. प्रेमराजजी भाला यांनी गाईड्स आणि स्काऊटस् चे कौतुक केले, त्यांना दिपावली च्या शुभेच्छा दिल्या.