नागपूर(Nagpur):- नवजात बाळाचा एक लाख १० हजार रुपयांत सौदा केल्याचा संतापजनक प्रकार शहरात उघडकीस आला. आरोपी दाम्प्त्याने १० हजार रुपये अग्रीम देऊन बाळाचा ताबा घेतला. उर्वरित एक लाख रुपये सोमवारी देणार होते. दरम्यान मुंबईचे (Mumbai)दाम्पत्य शनिवारी नागपुरात पोहोचले. बाळाचा ताबा घेत असतानाच गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
तिसऱ्या अपत्याची गरज नव्हती; गर्भपात करण्याचाही केला प्रयत्न
सुनील गेंडरे (३१) आणि त्याची पत्नी श्वेता गेंडरे (२७), रा. कळमना असे बाळाच्या आई-वडिलांचे (Parents)नाव आहे. तर बाळाचा सौदा करणारे प्रमोद इंगळे आणि किरण इंगळे, रा. पांढराबोडी आणि ज्यांना बाळ पाहिजे होते ते मुंबईचे रहिवासी असून किरणची सख्खी बहीण आहे. पौर्णिमा शेळके आणि स्नेहदीप शेळके अशी त्यांची नावे आहेत. सहाही लोकांविरुध्द कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमना येथील रहिवासी सुनील मजुरीचे काम करतो. त्याला मुलगा आणि मुलगी आहे. आर्थिक स्थिती (Financial status)अतिशय खालावलेली आहे. दरम्यान श्वेता गर्भवती झाली. परंतु त्यांना तिसऱ्या अपत्याची गरज नव्हती. त्यांनी गर्भपात करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, धोका असल्याने तो मागे घेतला. प्रसूतीची वेळ जवळ आली. श्वेतालाशासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. तिने १८ ऑगस्टला एका गोंडस (मुलगा) बाळाला जन्म दिला. तिला २२ ऑगस्टला रूग्णालयातून सुटी झाली.
पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनात कारवाई
ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त राहुल माकणिकर, सहायक पोलिस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात तस्करीविरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या नेतृत्वात एएसआय गजेंद्रसिंह ठाकूर, राजेंद्र अतकरे, श्याम अंगुलवार, दीपक बिंदाने, विलास चिंचुलकर, अश्विनी खोडपेवार, पल्लवी वंजारी, वैशाली किन्हीकर, शेख शरीफ व ऋषी डुंबरे यांनी केली.
आई-वडिलांसह दोन दाम्पत्यांवर गुन्हा दाखल
दहा हजार रुपये दिले अग्रीम दरम्यान मुंबईला राहणारी किरणची बहीण पौर्णिमा हिला मुलबाळ नाही. त्यामुळे ती बाळ दत्तक घेण्याच्या प्रयत्नात होती. तसे बहीण किरणला सांगितले. दरम्यान किरणला माहिती मिळाली की, श्वेताची प्रसूती झाली असून तिची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. किरण आणि तिचा पती प्रमोदने प्रसूत दाम्पत्याशी संपर्क साधला. आम्हाला बाळ दत्तक पाहिजे असून त्याबदल्यात रक्कम देण्याची ग्वाही दिली आणि ही माहिती पौर्णिमाला सांगितली. पौर्णिमाच्या सांगण्यावरून किरणव तिचा पती प्रमोदने सुनील १० हजार रुपये अग्रीम रक्कम दिली आणि बाळाचा ताबा घेतला.
खरेदी-विक्रीचा संतापजनक प्रकार
एक लाख टाकणार होते बँक खात्यात सोमवार २६ ऑगस्टला सुनीलच्या बँक खात्यात एक लाख रुपये टाकणार होते. ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळीच स्नेहदीप आणि पौर्णिमा नागपुरात बहिणीकडे आले. बाळाचा ताबा घेणार असल्याची गोपनीय माहिती मानवी तस्करीविरोधी पथकाला मिळाली होती. दबा धरून बसलेल्या पथकाने प्रमोद, किरण, स्नेहदीप, पौर्णिमा यांना ताब्यात घेतले. नंतर बाळाचे आई- वडिलांनाही ताब्यात घेतले. सखोल चौकशीनंतर त्यांच्या विरुध्द कळमना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.