यवतमाळ (Yavatmal):- राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मधील व्यापक अनियमितता आणि त्यासोबत अन्याय लक्षात घेता नीट-२०२४ परीक्षा त्वरित रद्द करावी. तसेच परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे
यंदाच्या परीक्षेत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. नीट २०२४ परीक्षा केंद्रांमधील गोंधळ, प्रश्नपत्रिका (Question paper) वेळेवर न पोहोचणे आणि तांत्रिक समस्यांमुळे(Technical problems) विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. विविध राज्यांमधून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत. ज्यामुळे निष्पक्षता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी नीट-२०२४ परीक्षेच्या निकालांमध्ये गंभीर अनियमिततेच्या तक्रारी(Complaints) केल्या आहेत. यामध्ये ग्रेस गुण आणि निकालांचे वितरण समाविष्ट आहे. या गंभीर अनियमितता लक्षात घेऊन सदर परीक्षा तत्काळ रद्द करावी. निष्पक्ष आणि पारदर्शक परीक्षा (Exam) नव्याने घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना एक निष्पक्ष आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली प्रदान करण्यात यावी. परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आणि निःपक्षपाती सीबीआय (CBI)चौकशी असावी, अशी मागणी ऋतिक सावंत यांनी तहसीलदारांना निवेदनातून केली आहे.