युवक कॅांग्रेसची कृषी अधिकारी कार्यालयावर धडक
अमरावती (Reliance Crop Insurance) : पिक विमा कंपनीचे सर्वेक्षण करणारे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन शेतकऱ्यांची लूट करत असल्याच्या तक्रारी युवक काँग्रेसकडे प्राप्त होत होत्या. अशाच एका पैशाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्यांनी नुकताच चोपसुद्धा दिला होता. याची शहानिशा करत असताना काही कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता असे लक्षात आले आहे की ज्या ‘रिलायन्स’ या कंपनीला शासनाने (Reliance Crop Insurance) पीक विमा सर्वेक्षणाचे कंत्राट दिले आहे त्या कंपनीकडून सर्वेक्षणासाठी लावण्यात आलेल्या या युवकांना आतापर्यंत कुठलाही पगार देण्यात आलेला नाही.
तसेच या युवकांना गावोगावी फिरत असताना कुठला अपघात किंवा दुर्घटना झाली तर कुठलाही विमा किंवा अन्य सुविधा यांना (Reliance Crop Insurance) पीक विमा कंपनीकडून देण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेण्याची एक प्रकारची छुपी मुभा या कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. उद्या शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कुठला गैरप्रकार घडला आणि एखाद्या गरजू युवकाला हकनाक बळी पडावे लागले तर याला पीक विमा कंपनी व कृषी विभाग जबाबदार असेल असा आरोप यावेळी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आला.
कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करतेवेळी जेव्हा या कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीशी दूरध्वनीवरून संवाद साधण्यात आला तेव्हा त्याने सुद्धा या युवकांना पगार दिला की नाही याबाबत अत्यंत उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बाहेरून आलेल्या या (Reliance Crop Insurance) कंपन्या जिल्ह्यातील बेरोजगार युवकांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना पगार न देता त्यांची पिळवणूक करून घेत आहे तसेच शेतकऱ्यांची लूट करण्यास सुद्धा प्रवृत्त करत आहेत, असा आरोप यावेळेस युवक काँग्रेसने केला आणि हा प्रकार न थांबवल्यास युवक काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
तसेच या (Reliance Crop Insurance) पीक विमा कंपन्याना ब्लॅक लिस्ट करून यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे, असे निवेदन अमरावती शहर युवक काँग्रेस कामगार सेलचे अध्यक्ष सागर वानखडे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले. यावेळी औद्योगिक सेल जिल्हाध्यक्ष समीर जवंजाळ व अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख उपस्थित होते.