हिंगोली (Dr. Dilip Maske) : विधानसभा निवडणुकीत डॉ. दिलीप मस्के यांच्यावर कोणी हल्ला केला नव्हता, त्यांनी स्वत:च तसा बनाव रचल्याचे निष्पन्न झाल्यावरून मंगळवारी पोलिसांनी डॉ. मस्केंसह (Dr. Dilip Maske) तिघांना ताब्यात घेतले.
याबाबत मंगळवारी पोलीस अधिक्षक कार्यालया तर्फे एक पत्रक प्रसिद्धीसाठी देण्यात आले असून त्यामध्ये डॉ. दिलीप मस्के (Dr. Dilip Maske) यांच्या वाहनावरील हल्ला बनावट असल्याचे सांगण्यात आले आहे. २० नोव्हेंबर रोजी विधान सभेसाठी मतदान होणार होते. त्यापूर्वी १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२.३० ते १ वाजे दरम्यान कळमनुरी विधानसभेकरीता वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवित असलेले डॉ. दिलीप मस्के (Dr. Dilip Maske) हे हिंगोलीकडे येत असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला होता. ज्यामध्ये डॉ.मस्के यांच्या छातीला मार लागल्याचे कळमनुरी पोलिसांकडे नोंदविण्यात आले होते.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या नियंत्रणात स्थापन झालेल्या पथकाने तपास केला. तपासात असे निष्पन्न झाले की, डॉ.सुरज राठोड यांनी बन्सी पवार यांच्या मार्फत प्रकाश चांदीवाले, वैभव राठोड, महेश भांगे, रामदास चपटे व गोपाल धोंडे सर्व रा. वसमत यांना हल्ला करण्यासाठी सांगितले होते. या सर्वांनी नकार दिल्यामुळे डॉ. सुरज राठोड, डॉ.दिलीप मस्के व डॉ.अफताब रहीम खाँ यांना गाडी फोडल्याप्रकरणी मंगळवारी ताब्यात घेतले.
हि कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पो.स्टे. कळमनुरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, सपोनि. रघुनाथ शेवाळे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, आझम प्यारेवाले, शेकुराव बेले, दत्ता नागरे यांनी केली.