परभणी (Parbhani):- शहरातील सत्कार कॉलनी आणि स्वप्न नगर अशा दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या – चांदीचे दागिने, रोख रक्कम मिळून अडीच लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी ८ नोव्हेंबरला नवा मोंढा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी शहरातील नवा मोंढा पोलिसात गुन्हा
नारायण निर्मळ यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, सत्कार कॉलनी येथील त्यांच्या घराचे अज्ञात चोराने कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले दिड लाख रुपये रोख आणि ७८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळून २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अज्ञात चोरावर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोउपनि. कार्तिकेश्वर तुरनर करत आहेत. दुसरी तक्रार अमोल वाघमारे यांनी दिली. स्वप्न नगर येथील त्यांच्या घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करुन सोन्या – चांदीचे दागिने (Gold and silver jewellery) व इतर साहित्य मिळून ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तपास पो.ह. चुडावकर करत आहेत.