बुलढाणा (Buldhana):- हिमोफिलिया आजारग्रस्त रुग्णाप्रती हिमोफिलिया फेडरेशनच(Hemophilia Federation) कार्य कौतुकास्पद असून, या आजाराचे उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातून संघटनेला केंद्र शासनाच्या (Central Govt) वतीने हवी ती मदत करण्याची ग्वाही केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात दिली.
आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठ्या रक्तस्त्रावाला सामोरे जावे लागते
हिमोफिलिया (बहुरक्तस्त्राव) हा दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठ्या रक्तस्त्रावाला सामोरे जावे लागते. वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यूदेखील (Death)ओढवतो. अशा या गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी काय उपाययोजना, औषधोपचार करता येतील, यासंदर्भात दोन दिवसीय विशेष चर्चासत्राचे आयोजन 30 व 31 जुलैला दिल्ली करण्यात आले होते. यासाठी हिमोफिलिया फेडरेशन इंडिया संघटनेने पुढाकार घेतला होता. रुग्णाचा जीवही वाचला पाहिजे अन् रोगाचे समूळ उच्चाटन कसे करता येईल, याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांसह संबंधित अधिकाऱ्यांनी मते व्यक्त केली. या चर्चासत्रात ना. प्रतापराव जाधव यांनाही निमंत्रित करण्यात आले होते, यावेळी देशभरातून आलेल्या तज्ञ डॉक्टरांचे (Doctor)मत जाणून घेतल्यानंतर मंत्री महोदयांनी या आजाराच्या उच्चटनासाठी फेडरेशन करीत असलेल्या कामाचं कौतुक करत फेडरेशनला केंद्र सरकारच्या वतीने हवी ती मदत करण्याची ग्वाही दिली.
दिल्लीतील राष्ट्रीय चर्चासत्रात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापरावांचे मुख्य मार्गदर्शन !
या चर्चासत्रात हिमोफिलिया फेडरेशन इंडियाचे रामू गाडकर, अध्यक्ष प्रेम रूप, डॉ. सेसील रॉस, एनएचएम संचालक डॉ. हर्ष मंगल, आयएएस अधिकारी आराधना पटनाईक, व्हीपी फायनान्सचे जगदीश शर्मा, मुंबईच्या केईएम हॉस्पिटलच्या डॉ. चंद्रकला, बंगळुरु मेडकिल कॉलेज आणि संशोधन केंद्राच्या डॉ. मीरा, नोव्हो नॉर्डीक्स (AIIMS New Delhi) चे प्रा. तुलीका सेठ, मुंबई आयसीएमआरचे डॉ. बिपिन कुलकर्णी, केरळाचे स्टेट नोडल ऑफिसर राहुल यूआर, मॉडेरेटर संतोष मनीवन्नम, आसामच्या डॉ. रितू सरकार, हिमाचल प्रदेशचे डॉ. कवींद्र लाल, आंध्र प्रदेशचया सोनिया मोहन, छत्तीसगडच्या निधी ग्वालरे, पंजाबचे डॉ. बॉबी गुलाटी, गुजरातचे डॉ. परुल भट्ट, जम्मू काश्मिरचे डॉ. बिलाल अहमद शेख, डॉ. व्यंकटेश पार्लीकर, डॉ. मोनिका पुरी, डॉ. अंकीत पंथ्री हे दोन्ही दिवस पूर्णवेळ चर्चासत्रात सहभागी झाले होते. अनुवांशिक असलेला बहुरक्तस्त्राव हा जीवघेणादेखील ठरत आहे. अशा रुग्णांच्या जीवाला धोका होऊ नये, औषधोपचाराने रुग्ण बरे व्हावेत तसेच हा आजारच होऊ नये, यादृष्टीने संशोधन केले जात आहे. या आजारावरील औषधोपचार महागडे आहेत. गरीब कुटुंबीयांना ते न परवडणारे आहेत. त्यावरील औषधोपचाराचा खर्च उचलण्याची तयारी हिमोफिलिया फेडरेशन इंडियाने दर्शविली आहे.
हिमोफेलिया फेडरेशनने आयोजित केलेल्या चर्चासत्रासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही चर्चासत्रात सहभागी घेत मते मांडली. महाराष्ट्रात या आजाराचे पाच हजार रुग्ण असल्याची नोंद असून बुलढाणा जिल्ह्यात देखील हिमोफेलियाचे अडीशेवर रुग्ण आहेत. हिमोफेलिया फेडरेशनच्या मदतीने जिल्ह्यातील रुग्णांवर औषध उपचार केल्या जाणार आहे या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वंतत्र कक्ष उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.