हिंगोली(Hingoli) :- नांदेड येथून सोने (Gold)खरेदी करून गावाकडे जवळाबाजार येथे दुचाकीवर निघालेल्या सराफा व्यापाऱ्यास स्कार्पीओ (Scorpio) मधून आलेल्या चौघांनी लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला नाही. या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमधून खळबळ उडाली आहे.
जीप चालकाने त्यांच्या जवळील ५० ग्राम सोने घेऊन काढला पळ
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळाबाजार येथे सराफा व्यापारी कन्हैया वाढवणकर यांचे जवळाबाजार येथे सराफा दुकान आहे. रविवारी ता. २३ ते नांदेड येथे दुचाकीवर सोने खरेदीसाठी गेले होते. त्या ठिकाणी कामकाज आटोपून ते रात्रीच्या सुमारास जवळाबाजारकडे निघाले. यावेळी वसमत फाटा ते औंढा नागनाथ मार्गावर चोंढी फाट्याजवळ एका स्कार्पीओ जीपने त्यांचा पाठलाग सुरु केला. दरम्यान, एका जीपमधून आपला पाठलाग केला जात असल्याचे लक्षात येताच कन्हैया यांनी त्यांचे दुचाकी वाहन परत वसमतकडे वळविले. मात्र वसमत फाटा येथे स्कार्पीओ चालकाने त्यांच्या दुचाकीसमोर जीप उभी केली. त्यानंतर चालकाने खाली उतरून इतर तिघांना कारमधील खंजीर काढण्याची सुचना केली. या प्रकारामुळे कन्हैया घाबरून गेले. त्यानंतर जीप चालकाने त्यांच्या जवळील ५० ग्राम सोने घेऊन पळ काढला.
त्यानंतर कन्हैया यांनी जीवमुठीत धरूनच जवळाबाजार गाठले. घरी आल्यावरही त्यांनी या घटनेची माहिती कोणाला दिली नाही. त्यानंतर आज सकाळी त्यांनी हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांना सांगितला. या प्रकरणी अद्यापपर्यंत वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात (Rural Police Station)गुन्हा दाखल झाला नाही.