लातूर (Latur):- गेल्या चार-सहा महिन्यांपासून लातूर शहरात फिरताना सामान्य लोकांचे अनेक प्रश्न लक्षात आले. मुख्यतः लातूरचे लोकप्रतिनिधी (आमदार) जनतेला भेटण्यासाठी उपलब्ध नसतात, ही बाब प्रामुख्याने लक्षात आली आहे. त्यामुळे आपण जनतेला सतत उपलब्ध राहणारे लोकप्रतिनिधी असू, असे सांगत या विधानसभा मतदारसंघात (Assembly constituencies) आपली लढाई काँग्रेससोबत राहील, असे स्पष्टीकरण शिवराज पाटील चाकूरकरांच्या सूनबाई तथा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार डाॕ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले. देशमुखांचा नामोल्लेख टाळत चाकूरकरांचा वारसा जपण्याची आपल्यावर नैतिक जबाबदारी असून आपण त्यादृष्टीने निश्चितपणे कार्यरत राहू, असेही त्या म्हणाल्या.
लोकांना भेटण्यासाठी आमदार उपलब्ध नसल्याची टीका
लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या भाजपामध्ये दाखल झाल्या. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई असलेल्या डॉ. अर्चनाताई या लातूरमध्ये आता माजी मंत्री अमित देशमुख यांच्याशी लढत देणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी लातूर शहरात जनसंपर्क चालविला आहे. या जनसंपर्काच्या माध्यमातून विविध समाज घटकांची त्यांनी संवाद साधलेला आहे. लोकांशी संवाद साधताना आपणास शहरातील अनेक प्रश्नांची जाणीव झाली, जनतेने जाणीव करून दिली. लातूरचे लोकप्रतिनिधी लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध नसतात ही लातूरच्या लोकांची मोठी खंत आहे, हे आपल्या लक्षात आल्याने आपण लोकांसाठी सदैव उपलब्ध असणारे लोकप्रतिनिधी राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान भाजपाने (BJP)आज लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना उमेदवारी जाहीर केले गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहरात भाजपाचा उमेदवार कोण याची उत्सुकता आणली गेली होती. माजी मंत्री तथा औशाचे माजी आमदार बसवराज पाटील यांच्या नावाची ही दोन दिवस जोरदार चर्चा झाली मात्र पक्षाने अखेर डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे नाव जाहीर केल्याने ही उत्सुकता संपली आहे.
कव्हेकरांवर भाजपमध्येही अन्यायच…
डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना भाजपाने उमेदवारी देऊ नये, यासाठी लातूर शहरातील अनेक जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी मुंबईपर्यंत दौरे ठोकून चाकूरकरांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. तसेच लातूर शहरातून माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, त्यांचे सुपुत्र अजित पाटील कव्हेकर यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. मात्र पक्षाने या सर्वांना बाजूला सारत डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भाजपाने यावेळी कव्हेकरांवर अन्याय केल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू झाली आहे.