लोकसहभागातून नद्या बारमाही वाहत्या ठेवणे शक्य – जिल्हाधिकारी अभिनव गोयल
‘चला जाणूया नदीला’ उपक्रमास हिंगोली जिल्ह्यात सर्वांकडून चांगला प्रतिसाद
हिंगोली (Chala Januya Nadila) : ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याला पूर आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी येथील नद्यांचे वाहून जाणारे पाणी लोकसहभागातून अडवावे लागेल, असे प्रतिपादन जागतिक दुष्काळ व पूर नियंत्रण आयोगाचे अध्यक्ष तथा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित एकदिवसीय पाणी परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, सरपंच भास्करराव पेरे पाटील, (Chala Januya Nadila) चला जाणूया नदीला उपक्रमाचे सदस्य तथा उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. राजेंद्र कदम, विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राणा म्हणाले, नदीला समजून घेऊन प्रदूषणावर मात करण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. नदीवरील अतिक्रमणामुळे व नदीमध्ये टाकण्यात येणा-या मानवनिर्मित भरमसाठ कचऱ्यामुळे त्यांचा मूळ प्रवाह बाधित होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रचंड पूर तर पावसाळा संपताच अल्पावधीतच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जगामध्ये सगळीकडे शहरीकरण वाढलेले आहे. आपल्या जिल्ह्यातील नद्यांची सीमा तपासून घेऊन त्या अतिक्रमणमुक्त करण्यासाठी त्यांचे आरेखन करणे आवश्यक आहे.
याकामी जिल्हाधिकारी गोयल यांनी उपविभागीय अधिकारी यांना या कामी लक्ष घालण्याच्या सूचना देण्याबाबत विनंती केली. तसेच शहरानजीक असलेल्या नदीमध्ये उद्योगधंद्याचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट सोडले जात असल्यामुळे त्या प्रदूषित होत आहेत. यातून नागरिकांचे (Chala Januya Nadila) व नदीचे आरोग्य धोक्यात येत असेही श्री. राणा यावेळी म्हणाले. पाण्याची धूप थांबविण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक असून, ओढे-नाले, तलाव, नदी आदी जलपरिसंस्थावर झालेले मानवी अतिक्रमणही याला कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिसंस्था अतिक्रमणमुक्त केल्यास त्या भागाला अगदी सहजरित्या पूर व दुष्कळमुक्ती करता येऊ शकते, असे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह राणा यांनी सांगितले.
आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी बोलताना म्हणाले, जयाजी पाईकराव यांनी कयाधू नदीला पुनरुज्जीवित करण्याचा वसा घेतला आहे. थेंबे थेंबे तळे साचेनुसारच ‘थेंबे थेंबे तळे आटे’ म्हणताना त्यांनी पाणी अडवून जमिनीत जिरवण्याचा, मुरवण्याचा उपस्थितांना सल्ला दिला. राज्य शासनाच्या विविध योजना असताना अद्यापही अनेक गावात शोषखड्डेच नाहीत. दैनंदिन वापरातील पाणी हे शोषखड्ड्यातच जिरविले गेले पाहीजे. 30 फुटावरील पाणीपातळी आता 300 फुटापर्यंत पोहचली आहे, यावर विचार न करता आता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. पाणी आणि झाडांचे अतूट संबंध आहेत. त्यामुळे नागरिकांसोबतच शासकीय यंत्रणांनी झाडे लावण्याबाबत विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे श्री. पेरे -पाटील यांनी सांगीतले. यावेळी त्यांनी त्यांच्या गावात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पावसाळा संपताच आटणाऱ्या नद्या बारमाही वाहत्या ठेवण्यासाठी लोकसहभाग वाढवावा लागेल, असे सांगून जलसमस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. या उपाययोजना करताना मूळ मुद्दावर लक्ष देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. कयाधू नदीवरील 365 गावांमध्ये गावनिहाय आश्वासित (Chala Januya Nadila) पाणी कृती आराखडा राबविताना पाण्याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगून, नागरिकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. तसेच याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा असल्याचे सांगितले. नदी पुनरुज्जीवनावर विचार करण्यासाठी गावपातळीवर काम करणे आवश्यक आहे. पाणी आराखड्यानुसार गावामध्ये शोषखड्डे तयार करणे, सांडपाणी, रेन वॉटर हार्वेस्टींग, सीसी बंधारे, वनतळे, शेततळे, वनराई बंधाऱ्यांची उभारणी करावी लागेल.
या (Chala Januya Nadila) माध्यमातून जलसमृध्द गाव तयार करावे लागतील. शेतीसाठी पाण्याचा वापर ठिबक व तुषार संचाच्या माध्यमातून करावा लागणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी गोयल यांनी जलपरिषदेला उपस्थित असणाऱ्या नागरिक, अधिकारी, जलप्रेमी यांच्याकडून सूचना मागविल्या. ग्रामपंचायतीचा कचरा नदीत टाकणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जलजीवन मिशनमधून एक जल साक्षरता युवा दूत होणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कयाधू नदी खोऱ्यातील 365 गावांमध्ये लोकसहभागातून नदी वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे सांगून या उपक्रमामध्ये अबालवृद्धांना सहभागी करून घेण्यात येईल. तसेच गावा-गावांमध्ये ही चळवळ रुजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जलसाक्षरतेबाबत जनजागृती करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी नरेंद्र चुग, सुशांत पाईकराव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. (Chala Januya Nadila) चला जाणूया नदीलाचे नोडल तथा विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांनी कयाधू नदी खोऱ्यात 365 गावे समाविष्ट असून, यात तालुकानिहाय सेनगाव 38, औंढा नागनाथ 39, हिंगोली 87, कळमनुरी 58, वसमत 4 आणि रिसोड तालुक्यातील 2 गावांचा समावेश असल्याचे सांगितले. (Chala Januya Nadila) ‘चला जाणूया नदीला’चे संकेतस्थळाचे यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास कांबळे यांनी केते तर आभार जयाजी पाईकराव यांनी मानले.
या (Chala Januya Nadila) कार्यशाळेला प्रशासकीय अधिकारी, चला जाणूया नदीला अभियान समितीचे सदस्य सचिव, जलयुक्त शिवार अभियान समितीचे सदस्य, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार समिती सदस्य, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, जलसाक्षरता केंद्र समिती, रोजगार हमी योजना केंद्र समिती, जैवविविधता समिती आणि पंचायत विकास इंडेक्स समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.